माणगांव येथील स्थानिक भारतगॅस कामगारांचा आमरण उपोषणाचा इशारा
नवीन माणगांव भारतगॅस एजन्सी कडून स्थानिक कामगारांच्या पोटावर पाय!
माणगांव : प्रमोद जाधव
माणगांवमध्ये आलेल्या नवीन माणगांव भारतगॅस एजन्सी कडून स्थानिक वाहनधारक व लोडर यांच्या पोटावर पाय आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे माणगांवमधील स्थानिक १३ कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या त्रासाला वैतागलेल्या व मागील बरेच वर्षांपासून काम करत स्थानिक भारतगॅस कामगारांनी ह्या नवीन "माणगाव भारतगॅस" एजन्सी च्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे व तसे प्रसिद्धी पत्रक देखील येथील अन्यायग्रस्त स्थानिक भारतगॅस कामगारांनी सर्व प्रशासकीय कार्यालये व सर्व प्रसारमाध्यमांना दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माणगांव तालुक्यातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी नियोजित एजन्सी ही अनुसूचित भटक्या जमातीकरिता राखीव आहे. काही वर्षांपूर्वी माणगांव मध्ये संजय मढवी यांची दत्तकृपा भारतगॅस एजन्सी कार्यरत होती. काही कारणास्तव ही एजन्सी बंद झाली. ग्राहकांची कुचंबणा होऊ नये याकरिता कंपनीकडून महाड मधील वारंगे भारतगॅस एजन्सी माणगांवला जोडण्यात आली होती व वारंगे भारतगॅस एजन्सीची सेवा चांगली होती आणि त्यांनी स्थानिक कामगार देखील कामावर घेतले होते. मात्र कंपनीच्या नियमानुसार आरक्षणाप्रमाणे नवीन "माणगांव भारत गॅस एजन्सी" नवीन मालकाला देण्यात आली आहे आणि या एजन्सी मालकाने परप्रांतीय कामगार, बाहेरील RTO पासिंग च्या गाड्या लावून स्थानिक कामगारांवर उपासमारीची वेळ आणली आहे असा उल्लेख स्थानिक कामगारांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे. या एजन्सी धारकाकडून जुन्या मुळच्या स्थानिक कामगारांना व वाहनधारकांना कामावर घेऊ असे अभिवचन देण्यात आले होते. मात्र कामावर घेऊन पगार देणार नाही, तुम्ही विक्री करा आणि सिलेंडर चे कमिशन घ्या. आणि लोडर चा पगार देखील त्यातूनच काढा अशी मनमानी करून या नवीन "माणगांव भारत गॅस एजन्सी" च्या मालकाने परप्रांतीय कामगार व परजिल्ह्यातील वाहने लावून स्थानिकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. या एजन्सीचा मूळ मालक देखील वेगळा आहे व चालवण्यासाठी माणगांवमध्ये आणलेला ठेकेदार देखील वेगळा आहे असे स्थानिक अन्यायग्रस्त कामगारांनी पत्रकारांना सांगितले आहे.
या स्थानिक कामगारांवर होणारा अन्याय याबाबतीत या कामगारांनी तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडे न्यायासाठी दाद मागितली पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्याकरिता या १३ कुटुंबाची होणारी उपासमार याची जर का दखल घेऊन आत्ताची "माणगांव भारत गॅस एजन्सी" दखल घेऊन जर स्थानिक कामगारांना व वाहनधारकांना कामावर घेणार नसेल तर या एजन्सी च्या कार्यालयासमोर आम्ही बेमुदत उपोषण करू असा इशारा माणगांव मधील स्थानिक कामगारांनी दिला आहे.
याबाबत पत्रकारांनी भारतगॅस चे सेल्स ऑफिसर विशाल काबरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या कडून समजले की, कोणती वाहने घ्यावी? कोणते कामगारांना घ्यावे हा त्या एजन्सी चा विषय आहे असे सांगितले. तसेच माणगांववासीयांना वितरणाच्या बाबतीत होणाऱ्या अडचणीत सांगितल्या असता, ज्यांना अडचण होत असेल त्यांनी एजन्सी च्या गोडाऊन मध्ये जाऊन सिलेंडर घ्यावा असे सांगत एजन्सी ची बाजू घेतली. मात्र समस्या दूर करण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे संभाषण न करता फोन कट केला.