रोहा तालुक्यात गुरे चोरणाऱ्या टोळीला नागरिकांच्या सतर्कतेमुळे रंगेहाथ पकडले!
रोहा : समीर बामुगडे
मागील अनेक महिन्यांपासून रोहा तालुक्यात गुरे चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरू होता. दरम्यान, नागरिकांच्या सतर्कतेमुळे या टोळीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहा तालुक्यातील गौळवाडी गावच्या हद्दीत जंगलभागात बोलेरो पिकअप गाडी क्र. MH06 AG 6138 मध्ये गुरांना निर्दयतेने कोंबून पळवून नेण्यात येत असल्याची फिर्याद रूपेश गजानन रेणोसे, रा. वराठी यांनी रोहा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलीसांनी नागरिकांच्या सतर्कतेमुळे सदरच्या पिकअप गाडीसह त्यामध्ये कोंबून भरलेल्या तीन गायींना ताब्यात घेऊन आरोपी सचिन बाळकृष्ण शिगरूत (रा. गौळवाडी-रोहा), दानिश इस्माईल लद्दू, ताबिश इस्माईल लद्दू, नादीश इस्माईल लद्दू (सर्व रा. खालचा मोहल्ला, अष्टमी-रोहा) यांच्या विरूद्ध भा.दं.वि. कलम 379, 34, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1060 चे कलम 11, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5(अ),9, मोटार वाहन कायदा कलम 66/192, 83/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. हिवरकर हे पुढील तपास करीत आहेत.