इरखार नगर, दिघी कोळीवाडा येथील पुर्व प्राथमिक (अंगणवाडी) विद्यार्थ्यांचे भविष्य शासकिय लालफितीमुळे अंधारात
देशाचे उज्ज्वल भविष्य कसे घडणार? लाखो रूपयांची आर्थिक तरतूद कोणाच्या घशात?
श्रीवर्धन : प्रतिनिधी
पुर्व प्राथमिक (अंगणवाडीमध्ये) शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक वाडी, मोहल्यानुसार अंगणवाड्या बांधण्यात आलेल्या आहेत. सदर अंगणवाड्यांमध्ये ५ वर्षाखालील विद्यार्थ्यांना पुर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अंगणवाडीच्या बांधकामापासून ते विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी वित्त आयोगाअंतर्गत लाखो रूपयांची तरतूद केली जाते. अशीच अंगणवाडी बऱ्याच वर्षांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यातील इरखार नगर, दिघी कोळीवाडा येथे बांधण्यात आली होती. सदर अंगणवाडीची सद्यस्थिती अत्यंत बिकट आहे.
सदर अंगणवाडीचा दरवाजा तुटलेला आहे, छप्पर ही उघडे आहे,विद्यार्थ्यांना बसण्यासाठीच्या खुर्च्या पूर्णपणे सडलेल्या आहेत,शौचालयाचीही अत्यंत गलिच्छ अवस्था आहे तसेच अंगणवाडीमध्ये केवळ १० ते १५ विद्यार्थीच बसू शकतात अशी अत्यंत दुरावस्था आहे. सदर अंगणवाडीची अत्यंत दयनीय अवस्था आहे. अंगणवाडी आहे की,अडगळीची खोली आहे की कोंडवाडा आहे हेच समजणे दुरापास्थ झाले आहे. सदर अंगणवाडीच्या बाजूलाच भले मोठे गटार असून गटाराच्या अस्वच्छतेमुळे,दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर बाब स्थानिक नागरिकांनी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी येथील ग्रामविकास अधिकारी, सरपंच,उपसरपंच यांच्या निदर्शनास आणून देऊन वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांकडून अंगणवाडीच्या दुरावस्थेबाबत दुर्लक्ष केले जात आहे. अशा अत्यंत गलिच्छ अवस्थेतील अंगणवाडीत देशाचे भविष्य घडवणारे विद्यार्थी शिक्षण कसे घेणार ? देशाचे उज्ज्वल भविष्य कसे घडणार? सदर अंगणवाडीसाठी प्रत्येक वर्षी लाखो रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती परंतु परिस्थिती जैसे थे अशीच आहे मग लाखो रुपयांच्या आर्थिक तरतूदीचे काय झाले? असा उद्विग्न प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. मागील ५ वर्षांमध्ये सदर अंगणवाडीसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद आणि सदर रक्कम पूर्णपणे खर्च न करता केवळ आर्थिक तरतुदींनुसार अंगणवाडीची कामे झाल्याचे केवळ कागदोपत्री दाखवण्यात आले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. इरखार अंगणवाडीसाठी करण्यात आलेल्या तथाकथीत विकासाकामांची वरीष्ठ अधिकारी यांचेकडून चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.त्यामुळे शासनाच्या गलथान कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून अंगणवाडीचे दुरावस्थेबाबत त्वरीत सकारात्मक निर्णय न घेतल्यास स्थानिक ग्रामस्थांनी कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी चे सरपंच यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
"मागील ५ वर्षांमध्ये इरखार अंगणवाडीसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद आणि करण्यात आलेली तथाकथित कामे यांची संबंधित वरीष्ठ शासकिय यंञणेने प्रामाणिकपणे चौकशी करावी."
- श्री. परशुराम पायाजी पायकोळी
श्रीवर्धन तालुका अध्यक्ष : अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार विरोधी समिती
सदस्य : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ,महाराष्ट्र राज्य