पहिली राज्यस्तरीय पॅरा कब्बडी चॅम्पियनशिप स्पर्धा गडब पेण येथे होणार
रोहा : समीर बामुगडे
ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर द डिसेबल्ड महाराष्ट्र आयोजित आणि सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र, कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन नवी मुंबई व कालंबादेवी युवक मंडळ गडब पेण यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील गडब पेण येथे पहिली राज्यस्तरीय पॅरा कब्बडी चॅम्पियनशिप स्पर्धा २०२२ या स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २२ मे २०२२ रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, सांगली, नवी मुंबई, नाशिक या सहा संघाचा समावेश असणार आहे. रायगड पॅरा कबड्डी संघात ओमकार महाडीक माणगांव, अक्षय निकम रोहा, राजा मोकल पेण, मुकुल खाडे पेण, हेमंत मोरे रोहा, महेश वसावे नंदुरबार, जयेश पाटील पेण, निखिल बडे माणगांव यांची निवड करण्यात आली आहे. तर कर्णधार म्हणुन रमेश संकपाल कर्जत, प्रशिक्षक म्हणून गणेश पाटील पेण व व्यवस्थापक म्हणून शिवाजी पाटील रोहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई पॅरा कबड्डी संघात कर्णधार म्हणुन मंगेश म्हात्रे पेण तसेच उमाजी जाधव रोहा, अनिल जाधव महाड, शैलेश शिंदे पेण, सुनिल खरात या रायगड जिल्ह्यातील दिव्यांग कब्बडी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई संघात चांगदेव शिरतर पुणे, रायसिंग वसावे नंदुरबार, सागर आइनकर रत्नागिरी, इच्छाराम केळुसकर सिंधुदुर्ग, यश शरमकर मुंबई याचीही निवड नवीमुंबई संघात करण्यात आली आहे अशी माहिती ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर द डिसेबल्डचे अध्यक्ष व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र चे सचिव शिवाजी पाटील यांनी दिली.