ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा व शिवबा हे ज्यांना समजले ते महाराष्ट्राचे झाले - ह.भ.प. जळकेकर महाराज
कीर्तन महोत्सवात केले हरी कीर्तन
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील चाळीसगाव वारकरी संप्रदाय यांच्या सौजन्याने मंगळवार 17 व बुधवार 18 मे रोजी ग्रामदैवत जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या पारायण,अखंड हरिनाम व कीर्तन महोत्सवात खांदेशरत्न ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली जळकेकर महाराज ज्यांना ज्ञानोबा,तुकोबा,विठोबा व शिवबा ही चार नावे समजले ते महाराष्ट्राचे झाले असल्याचे सांगितले. यावेळी नागोठणे विभागासह चाळीस गावातील वारकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोवर्धन पोलसानी यांच्या सौजन्याने जळगाव येथील खांदेशरत्न ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली जळकेकर यांनी केलेल्या हरिकीर्तनात पुणे जिल्ह्यात शिवाजी महाराज व तुकोबारायाचा जन्म आहे. घाटावरील पुण्यातून कोकणातील पनवेल पर्यंत मिरची आणून त्याचा व्यापार करून इकडून मीठ नेण्याचा प्रथम व्यापार तुकोबारायांनी केला. त्यांचे पाय ज्या जमिनीला लागले त्याचे सोने झाले. कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. छत्रपती शिवाजीमहाराजही समोर बसून तुकोबारायांचे कीर्तन ऐकत होते.यांना ज्ञानोबा,तुकोबा,विठोबा व शिवबा ही चार नावे समजले ते महाराष्ट्राचे झाले असल्याचे सांगून जो गावाचं,देवाचं व भावाचं खातो तो कधी सुखी होत नसल्याचे शेवटी जळकेकर महाराज यांनी सांगितले.
आपल्या काल्याच्या कीर्तनात भिवंडी येथील वाणीभूषण ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांनी सांगितले की, ज्ञानोबा हे स्वता नवल आहेत,जिथे भिक्षेची झोळी फाडली तेथे आज दही दुधाचे अभिषेक चालले आहे, ज्यांना दारात उभे राहू दिले नाही पण आता दारात पालखी येण्यासाठी भांडतात,मूर्ख समजणार्या रेड्याच्या तोंडी वेद म्हणविले असे अनेक नवल ज्ञानोबारायाच्या बाबतीत होते. जे ज्ञान कुणालाही कळण्यासारखे नव्हते ते कळण्यासारखे केले,आज ज्ञानोबांच्या कृपेने बहुजन समाजाचा पाटील नावाची व्यक्ति कीर्तन करीत असल्याचे सांगुन प्रत्येक उपासनेत कृष्ण असतो.कृष्ण हा एक नवल कारण तो तुरुंगात जन्मला व सोन्याच्या व्दारकेचा मालक होतो,जिथे जन्माला आला तिथे वाढला नाही,जिथे वाढला तिथे थांबला नाही,जिथे थांबला तिथे राहिला नाही,राहिला तिथे रमला नाही,लोण्याची चोरी करायचा पण गोपाळांना खाऊ घालायचा,ज्या ठिकाणी चोरी करायचा त्या ठिकाणी तीन पट लोणी व्हायचं,गोपिकांनी कृष्णांने चोरी करावी अशी अशा करणे हे सर्व कृष्णाच्या बाबतीत नवलच असल्याचे सांगून कृष्ण हा नवलाईचे नाव असल्याचे शेवटी पाटील महाराजांनी सांगितले.
या धार्मिक कीर्तन महोत्सव कार्यक्रमात मंगळवार 17 मे रोजी सकाळी दीप प्रज्वलन, मंगलपूजन, कलशपूजन, ध्वजारोहण ,विणापूजन, ज्ञानेश्वरी पूजन झाल्यानंतर स.10.00 ते दु. 1.00 ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन 1.00 ते 3.00 महाप्रसाद सायं. 4.00 ते 6.00 नागोठणे विभाग चाळीसगाव वारकरी संप्रदायचे सामुदायिक हरिपाठ,सायं. 7.00 ते रात्री 9.00 हरी कीर्तन,रात्री 9.00 वा. महाप्रसाद त्यानंतर हरीजागर करण्यात आला. तसेच बुधवार 18 मे रोजी पहाटे 4.00 ते 6.00 काकड आरती,सकाळी 10.00 ते 12.00 वा. भिवंडी येथील वाणीभूषण ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दुपारी काल्याच्या महाप्रसादाने या धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाळीसगाव वारकरी संप्रदायचे सर्व पदाधिकारी-सदस्य व हरिभक्त यांनी अपार मेहनत घेतली.