दारूच्या नशेत रिक्षा भाड्यावरून वाद करून दुखापत केल्याप्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
माणगांव : प्रतिनिधी
दारूच्या नशेत रिक्षा भाड्यावरून वाद करून एकास दुखापत केल्याची घटना १३ मे रोजी माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, १३ मे रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास पाणोसे गावच्या हद्दीत पाणोसे नदीजवळ फिर्यादी इस्माईल चांद नदाफ रा. एकता नगर माणगांव याला घटनेतील आरोपी अमित बुटे व राजा पवार दोघेही रा. उतेखोलवाडी हनुमान मंदिराशेजारी, यांनी रिक्षा भाड्याचे ४०० रु देण्याकरिता बोलावून यातील अमित बुटे यांनी दारूच्या नशेत नमूद रिक्षा भाड्यावरून वाद करून शिवीगाळ करून कानाखाली मारली व राजा पवार यांनी घटनेच्या ठिकाणी पडलेला लाकडी बांबू घेऊन इस्माईल नदाफ उर्फ (राजा) याच्या उजव्या गुडघ्यावर मारला व दोन्ही आरोपींनी संगनमत करून इस्माईल नदाफ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ.गु.रजि.नं. १२१/२०२२, भा. दं. वि. स कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक मिलिंद खिरीट हे करीत आहेत.