अनधिकृत भोंग्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करा!
माणगांव तालुका मनसेचे माणगांव पोलीस निरीक्षकांना निवेदन
माणगांव : प्रमोद जाधव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात मशीद, दर्गे, मदरसा व इतर धार्मिक स्थळे यावरील ध्वनी प्रदूषण करणारे भोंगे ३ मे २०२२ पर्यंत उतरविण्याची मोहीम राज्यभरात आणि रायगड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. तर माणगांव तालुक्यातील अशा प्रकारचे भोंगे कायमस्वरूपी काढण्यात यावेत याकरिता मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना ३० एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले आले आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना माणगाव तालुका अध्यक्ष प्रतीक रहाटे यांच्या समवेत मनसे माणगांव तालुका सह संपर्क अध्यक्ष संतोष (चिमण) सुखदरे, इंदापूर विभाग अध्यक्ष ओमकार मिरगुडे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.
या निवेदनामध्ये देशात प्रत्येकाला आपआपल्या धर्म प्रार्थनेचे स्वातंत्र्य असले तरी त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊ नये अशी माफक अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालय, कर्नाटक उच्च न्यायालय, कलकत्ता उच्चन्यायालयाच्या विविध न्यायनिर्णयानुसार अनधिकृत भोंगे काढून टाकण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा व वेळ निश्चित करून दिली आहे. तरी काही विशीष्ट समुदायाकडून कायद्याचे उल्लंघन केले जाते व पोलीस प्रशासनाला नेहमी गृहीत धरले जाते. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे हा प्रश्न धार्मिक नसून,संपूर्णपणे सामाजिक स्वरूपाचा आहे.तेंव्हा सर्वधर्मीय नागरिकांच्या हक्कासाठी व समाजहितासाठी भोंग्याचा त्रास कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करून सर्व अनधिकृत भोंग्यावर त्वरित कारवाई करावी असा असा आशय या निवेदनात नमूद करण्यात आला आहे.