पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांचे अनाधिकृत बांधकामा विरोधात १ मे पासून बेमुदत उपोषण
गोरेगाव : प्रतिनिधी
अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करा असे राज्य सरकारचे आदेश असतानाही गोरेगांव ग्रामपंचायत अशा अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करायला टाळाटाळ करीत असल्याने आणि पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांनी अशी अनाधिकृत बांधकामे निदर्शनास आणुन देखील कारवाई होत नसल्याने अखेर प्रसाद गोरेगांंवकर हे १ मे (महाराष्ट्र दिनी) उपोषणास बसणार आहेत.
सध्या मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामांचे पेव गोरेगांव ग्रामपंचायत हद्दीत जोमाने चालु आहेत. परंतु गोरेगांव ग्रामपंचायत जाणीपूर्वक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. बांधकाम करण्यासाठी विकासकांना नगरविकास रचनेकडून बांधकाम परवानगी अनिवार्य आहे. या बांधकाम परवानगीसाठी अनेक अटी शर्थी नगर विकास रचनेकडून दिल्या जातात. परंतु अशा अटीशर्थींचे पालन हे विकासक करताना दिसून येत नाही शिवाय संबंधित अधिकारी सुद्धा कधी अशा चालु असलेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी येत नाही, आणि त्यात ग्रामपंचायत जाणीवपुर्वक याकडे दुर्लक्ष करीत असते.
गोरेगांवातील लक्ष्मी पेठेत सुद्धा अशाच प्रकारे "लक्ष्मीनारायण" या संकुलाचे बांधकाम करण्यात आले असून त्यांना सुद्धा नगरविकास रचनेकडून अटीशर्थीचे पालन करुन बांधकाम परवानगी देण्यात आली होती. परंतु नगरविकास रचनेच्या अटीशर्थी प्रमाणे या संकुलाचे बांधकाम झाले नसून याबाबत पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांनी सतत पाठपुरावा करुन ग्रामपंचायत तसेच गटविकास अधिकारी यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती.
या संकुलाच्या बाहेर असणारी शेड ही अनाधिकृत आहे शिवाय इतर बाबी या नगरविकास रचनेच्या नियमानुसार झालं नसल्याचे ग्रामपंचायतीने मान्य केलेले आहे. खरतंर अशा अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे पुर्ण अधिकारी ग्रामपंचायतीकडे असताना देखील सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी हेतुपुरस्सर कोणतीही कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नगर विकास रचना कार्यालय व रा. जि. प. कार्यालय अलिबाग यांच्याशी पत्रव्यवहार करुन देखील कोणत्याही प्रकारे या संकुलावर कारवाई होत नसल्याने दि. २० एप्रिल रोजी प्रसाद गोरेगांवकर यांनी जिल्हाधिकारी यांना आपण १ मे रोजी (महाराष्ट्र दिनी) ग्रामपंचायत कार्यालय, गोरेगांव येथे जोपर्यंत या अनाधिकृत संकुलावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचे पत्र दिले आहे.