माझदा कलर्स कंपनीच्या कामगारांकडून आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र राज्य औद्योगिक कामगार महासंघाचा कामगारांना पाठींबा
रोहा : किरण मोरे
धाटाव औद्योगिक परिसरातील माझदा कलर्स लि. कंपनीतील कामगारांच्या मागणीपत्रावर व्यवस्थापन चर्चा करत नसल्याने कामगारांचे धरणे आंदोलन सुरू आहे.
या कंपनीतील कामगार एप्रिल २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक कामगार महासंघ या संघटनेचे सभासद झाले. त्याबाबत संघटनेने कंपनीस पत्राद्वारे कळविले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संपर्क देखील साधला. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महासंघाने कामगारांच्या वतीने दिनांक २२ ऑगस्ट २०२१ चे मागणी पत्र कंपनीस पोस्टाने पाठविले आहे. तसेच दिनांक ३० ऑगस्ट २०२१ रोजी इमेल व्दारे पाठविण्यात आले आहे. या मागणीपत्रावर चर्चा करण्याची विनंती संघटनेने वारंवार केलेली आहे. मात्र कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आलेले आहे. तसेच एकीकडे युनियनबरोबर चर्चा करण्यास टाळाटाळ करत असताना तुम्ही अंतर्गत युनियन स्थापन करा आपण लगेच चर्चा सुरु करु अशा पध्दतीने कामगारांना बोलवून कंपनीचे अधिकारी सांगत आहेत.
मागणीपत्र देउन ८ महिने पूर्ण होउन गेलेले आहेत. तरी व्यवस्थापन चर्चा करत नाहीत, कामगारांना कायद्याने ठरवून दिलेल्या किमान बोनसपेक्षाही कमी बोनस देण्यात आलेला आहे. तसेच अन्य अनेक पद्धतीने कामगारांना त्रास दिला जात आहे.
या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी कारखान्यातील कामगार दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी कारखान्याच्या गेट समोर अथवा तहसिलदार - रोहा यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणा आंदोलन करतील. तसेच त्या पूर्वी दिनांक ०६ एप्रिल २०२२ ते १० एप्रिल २०२२ या काळात काळ्या फिती लावून काम करतील आणि कामाची पाळी संपल्यानंतर बाहेर जाताना कारखान्याच्या गेटवर घोषणा देऊन व्यवस्थापनाचे कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष्य वेधतील याची कृपया नोंद घ्यावी असा इशारा महाराष्ट्र राज्य औद्योगिक कामगार महासंघाच्या वतीने जनरल सेक्रेटरी अॅड. अनिल ढुमणे यांनी दिला आहे.