वनसंरक्षक रोहा कार्यालयात अधिकारीच बनलेत ठेकेदार? खारी-काजू वाडी बंधाऱ्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार
नदीतले दगडगोटे टाकून बांधला कॉंक्रीट बंधारा, वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे ठेकेदाराशी साटेलोटे
रोहा वनविभागात अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रचंड भ्रष्टाचार
निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे अधिकारी कारवाईच्या रडारवर
रोहा : किरण मोरे
रोहा वन विभागांतर्गत रोहा तालुक्यातील काजू वाडी येथे वन बंधारा बांधकाम करणे हे काम सुरू आहे. अलिबागच्या अक्षय टोपले या एजेंसीला काम करण्याचा ठेका दिलेला आहे. मात्र प्रत्यक्षात हे काम कार्यालयातील अधिकारीच करत आहेत. या कामात बंधाऱ्याच्या कॉंक्रीटमध्ये नदीतील दगडाचे मोठमोठे गोलटे टाकण्यात आलेत आणि ते झाकण्यासाठी वरुन सिमेंट चा मुलामा दिलेला आहे. वापरण्यात आलेल्या कॉंक्रीटचा दर्जा अतिशय सुमार आहे. या कामाची मोजमापे सुद्धा वाढवून लिहिली गेली आहेत. ग्रामस्थांनी आणि स्थानिक पत्रकारांनी कामाच्या दर्जाबाबत वारंवार तक्रार केली आहे. मात्र निब्बर अधिकारीच पडद्यामागचे ठेकेदार असल्याने आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.
या कामांवर देखरेख करण्यासाठी वनविभागाकडे स्थापत्य अभियंता नाही. त्यामुळे या कामाची रोजची प्रगती रेकॉर्ड केली जात नाही. झालेल्या कामाचे एकाच दिवशी बील खतवले जाते. जमीनीतील झालेल्या कामाची रेकॉर्ड एंट्री नसताना अधिकारी वारेमाप बील खतवतात. दरवर्षी अशी कित्येक कोटी रुपयांची बांधकामे वनसंरक्षक रोहा विभागाकडून काढली जातात. अशा अनेक रोहा वनविभागाच्या तक्रारी मुख्य वनसंरक्षक ठाणे यांचेकडे करण्यात आल्या आहेत. या भ्रष्टाचारात सहभागी सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत याचा पाठपुरावा घेतला जाणार आहे.
तसेच सदर भ्रष्ट कामांच्या दर्जाची आणि या कामाच्या निविदा प्रक्रियेपासून बील अदा करण्यापर्यंतच्या प्रशासकीय कामकाजाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी "बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी" या रायगड जिल्ह्यातील विश्वसनीय संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडीट करून घ्यावे. अशीही मागणी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.