पोलीस ठाण्यात आरोपीची आत्महत्या प्रकरण...
ड्युटी करताना कामचुकारपणा भोवला
पोलीस नाईक सुनील पाटील आणि प्रणित पाटील निलंबीत
पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची उचलबांगडी
रोहा : किरण मोरे
रोहा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीतील आरोपी रवी वाघमारे याने १४ एप्रिलच्या पहाटे कोठडीतच केलेल्या आत्महत्या प्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीअंती रोहा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. ठाणे अंमलदार असलेले सुनील पाटील व हवालदार प्रणित पाटील या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी ही कारवाई केली आहे.
निलंबीत करण्यात आलेल्या सुनील पाटील याच्याविषयी तर अनेकांच्या तक्रारी होत्या. ड्युटी कशी करायची हे सुनील पाटील याला कळतच नव्हते. ड्युटी सोडून भलतेच उद्योग करायचे व कामचुकारपणा करून सर्वसामान्यांना त्रास द्यायचा असे उद्योग या सुनील पाटीलने सुरू ठेवले होते. या सुनील पाटीलच्या "आगावपणाबद्दल" उच्चस्तरिय तक्रारीही दाखल झालेल्या होत्या. दरम्यान, याच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
पत्नीच्या खुनाच्या आरोपात अटकेत असलेला आरोपी रवी वाघमारे याने रोहा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत पांघरण्यासाठी देण्यात आलेल्या चादरीची कडा वापरुन गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अशोक दुधे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होत. दुपारनंतर महाराष्ट्रातील विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांची भेट घेऊन या प्रकारास जबाबदार असणार्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
रोहा पोलीस स्थानकात घडलेली घटना ही संबंधित अधिकारी व कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे घडली असल्याचा आरोप करुन दोषींवर तातडीने कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य आदिम कातकरी जमाती संघटनेने दिला होता. तसेच अनेक सामाजिक संघटनांनीही याप्रकरणी आवाज उठवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पुढील तपास रोहा उप विभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यंवंशी हे करीत आहेत.