को ए सो मेहेंदळे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची काळकाई वृद्धाश्रमाला मदत 

रोहा : समीर बामुगडे

कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगात खळबळ माजवली होती. अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. सरकारी यंत्रणा देखील कमी पडू लागली होती. अशा वेळी अनेक स्वयंसेवी संस्था, वेगवेगळे ग्रुप प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला उतरून काम करत होते. 

त्याचवेळी को. ए. सो. मेहेंदळे हायस्कूलच्या ई १० च्या १९९७ - ९८ च्या बॅचने देखील या कार्यात खारीचा वाटा उचलून कोरोनाच्या रुग्णांना मदत म्हणुन काही निधी जमा केला. पण सुदैवाने ही प्रोसेस सुरू असतानाच कोरोनाचा प्रभाव ओसरू लागला. आता प्रश्न पडला होता की या जमा झालेल्या निधीचं करायचं काय? खूप जणांनी वेगवेगळे पर्याय सुचवले आणि त्यातील एक पर्याय समोर आला तो म्हणजे कोलाड जवळील  संभे गावातील काळकाई वृद्धाश्रमाला काहीतरी मदत करण्याचा आणि त्याचवेळी याच बॅचचे डॉ. मनिष वैरागी यांनी देखील त्याच वृद्धाश्रमाला हॉस्पीटल बेड ची गरज आहे, आपण ती मदत करू शकू असे सुचवले आणि सगळ्यांनाच ती कल्पना आवडली. अजुन एक गोष्ट सांगायलाच हवी ती म्हणजे ग्रुप कडे जमा झालेल्या निधीतून २ हॉस्पिटल बेड येणार होते. ग्रुप मधील एक सदस्य, देवेंद्र मुंढे यांनी ग्रुपला तर निधी दिलाच, पण त्याशिवाय त्यांनी त्यात अजुन एक बेड येईल इतका निधी देऊन अजुन एक बेड आणण्यास हातभार लावला.

रविवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी काळकाई वृद्धाश्रमात एका छोटेखानी कार्यक्रमात हे हॉस्पीटल बेड आश्रमाला सुपूर्द करण्यात आले. १० वी च्या १९९७-९८ च्या बॅचपैकी ज्यांना शक्य होते असे मेहेंदळे हायस्कूलचे माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. संस्थेतर्फे सुनंदा मोहिते यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आश्रमातील वृद्धांची आस्थेने चौकशी केली. त्याचवेळी ग्रुपमधील एक सदस्य आणि अपंग संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी देखील त्यांच्या संस्थेतर्फे वृद्धाश्रमातील अपंग असणाऱ्या वृद्धांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी विद्यार्थ्यापैकी एक असणारे प्रशांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. तर याच बॅचचे एक विद्यार्थी आणि रोह्यातील प्रख्यात डॉ. मनीष वैरागी यांनी सदर उपक्रमामागचा ग्रुपचा हेतू विशद केला. कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा काळकाई वृद्धाश्रमाच्या संचालिका सुनंदा मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले. सदर उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने भूषण देशपांडे, भालचंद्र पवार, प्रांजली थोरे यांनी विशेष मेहनत घेतली.

ग्रुप खूप असतात, पण असं काहीतरी विधायक काम ग्रुपकडून होणार असेल तरच त्या ग्रुपला काहीतरी अर्थ प्राप्त होतो. को ए सो मेहेंदळे हायस्कूलच्या ई १० वी च्या १९९७-९८ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन हा उपक्रम राबविला हे खरंच कौतुकास्पद आहे.

Popular posts from this blog