"समर्थ वैभव" वृत्तपत्राचा ९ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न
पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांचा सन्मान
रोहा : प्रतिनिधी
सलग ९ वर्षे अखंडितपणे सुरू असणाऱ्या "समर्थ वैभव" या वृत्तपत्राचा ९ वा वर्धापन दिन सोहळा दि. १८ एप्रिल २०२२ रोजी रोहा येथे संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकूर हे उपस्थित होते.
याप्रसंगी एकूण १५ मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उत्कृष्ट नगरसेवक, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट कामगार, उत्कृष्ट ड्रायव्हर, उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट उद्योजक, उत्कृष्ट नायब तहसिलदार, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट समाजसेवक या पुरस्कारांचा समावेश आहे.
यावेळी "समर्थ वैभव" वृत्तपत्राचे संपादक श्री दिनकर खरिवले यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून आपल्या वृत्तपत्राविषयी माहिती सांगितली. त्यानंतर उपसंपादक निलेश पिंपळकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, "समर्थ वैभव" च्या वर्धापन दिन कार्यक्रमाला यापूर्वी प्रत्येक वर्षी ज्येष्ठ पत्रकार कै. आप्पासाहेब देसाई हे आवर्जून उपस्थित असायचे. परंतु ते हयात नसल्यामुळे त्यांची कमतरता आम्हाला कायम जाणवेल.
याप्रसंगी संपादक दिनकर खरिवले, उपसंपादक निलेश पिंपळकर, पत्रकार अल्ताफ चोरडेकर, पत्रकार विश्वजीत लुमण, नगरसेवक मयुर दिवेकर, महेश कोलाटकर, तसेच सौ. निशा पिंपळकर, रोहेकर मॅडम, सौ. संचिता तेलंगे, सचिन तेलंगे, भातसई ग्रा. पं. सरपंच गणेश खरिवले, माजी सरपंच लिलाधर थोरवे, चिंतामण खरिवले, हरिश्चंद्र खरिवले, बळीराम थोरवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संपादक श्री दिनकर खरिवले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.