उद्या माणगांव येथे श्री दत्त जत्रा
जत्रेतील अवैध धंद्यावर माणगाव पोलीसांची राहणार करडी नजर?
माणगांव : प्रमोद जाधव
गेले दोन वर्षाचे कोरोना आणि लॉकडाऊन च्या त्रासातुन मुक्त होत सर्व नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर येत असलेले दिसून येत आहे. सण व उत्सवावरील निर्बंध हटविण्यात आल्याने कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावचे जत्रोत्सव यावर्षी मोठ्या आनंदी वातावरणात साजरे होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे माणगाव ची दत्ता ची जत्रा यावर्षी उद्या २४ एप्रिल रोजी होत आहे. यामुळे माणगांवकर नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
माणगांव ची जत्रा म्हणजे तालुक्यातील सगळ्यात मोठी जत्रा समजली जाते. या माणगांवच्या जत्रेत माणगांव नगरपंचायत हद्दीतील नाणोरे, उतेखोल, भादाव, खांदाड, जुने माणगांव येथील नागरिकांसह गावच्या देवांच्या काठ्यांची जंगी मिरवणूक व आतषबाजी व रोषणाई देखील असते.
ज्या ठिकाणी जत्रा भरते ते माणगाव शहरातील मध्यवर्ती मुंबई गोवा महार्गावर असलेले श्री दत्तमंदिर हे अनेक वर्षांपासून जिर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे जत्रा कमिटी व दत्तमंदिर विश्वस्त कमिटी या मंदिराचा जीर्णोद्धार तरी करणार? असा सवाल माणगाव तालुकावासीय उपस्थित करत आहेत.
मागील दीड ते दोन महिन्यांपासुन सर्वत्र जत्रा सुरू आहेत.या जत्रांमध्ये विविध प्रकारच्या व्यापाऱ्यांची म्हणजे लहान मुलांची खेळणी, गृहउपयोगी वस्तू ते आकाशपाळणे, मिठाई अशा अन्य प्रकारच्या दुकानांची रेलचेल असते आणि याबरोबरच सध्या चक्री, लाल-काळा, चिमणी-पाखरू, अंदर-बाहर अशा प्रकारच्या अवैध धंद्यांनी देखील जत्रांमध्ये ठाण मांडले आहे. हे धंदे जत्रेमध्ये कुठल्यातरी एका कोपऱ्यात चालवले जातात. तर काही ठिकाणी राजरोसपणे अगदी रोषणाई करून चालविले जात असल्याचे मागील काही दिवसांपासून माणगाव तालुक्यातील होणाऱ्या जत्रांमध्ये दिसून येत आहे.
जत्रांमध्ये अश्या चाललेल्या अवैध धंद्याकडे पाहून पोलीस प्रशासन शांत का असते? हा उद्विग्न सवाल गेले दोन वर्षे जत्रोत्सवाच्या आनंदाला मुकलेले सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत.या अवैध जुगारी धंद्यावर, मद्यपी आणि तरुणांची झुंबड उडालेली असते यामध्ये हार-जित होऊन एखाद्याची लूटमार देखील होते. अशा कारणांमुळे वाद भानगडी झाल्याचे प्रकार देखील मागील काही दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील काही जत्रांमध्ये दिसून आले आहेत व अशा अवैध धंद्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला देखील बाधा निर्माण होत आहे.
यामुळे तालुक्यातील सर्वात मोठया आज होणाऱ्या माणगाव च्या जत्रोत्सवामध्ये हे अवैध धंदेवाले कुणालाही न जुमानता आपले बस्तान बसवणार का? की माणगांव पोलीस यावर निर्बंध लावणार? असा सवाल माणगांव तालुका शहरातील सुजाण नागरिक उपस्थित करत आहेत. तर जत्रेतील अश्या लूटमारीच्या अवैध धंद्यावर पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी देखील जत्रेच्या पूर्वसंध्येपासून माणगाव मधून जोर धरू लागली आहे.