वडखळ वाहतुक पोलीसांकडून वाहनचालकांची लूटमार?
वडखळ वाहतूक चौकीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे : वाहनचालकांची मागणी
वाहतूक पोलीसांच्या "दादागिरी" मुळे वाहनचालक हैराण!
रायगड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात वडखळ वाहतूक पोलीसांकडून वाहनचालकांना त्रास देण्याचे प्रकार वाढू लागले असून विशेष करून मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ येथे वाहतूक पोलीसांचा "धंगडधींगा" जास्त प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे.
अवैध वाहतूकीचे प्रमाण वाढले
रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर अवैध वाहतूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले असून वडखळ मार्गावरून अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या मार्गावरून वडखळ वाहतूक पोलीसांना मोठ्या प्रमाणात हफ्ता पोहचत असल्यामुळे या मार्गावरून अवैध वाहतूकीचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा वाहतुक पोलीस निरीक्षकांचे नियंत्रण आहे का?
वडखळ वाहतूक पोलीसांचे उपद्व्याप पाहता यांच्यावर जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षकांचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
वाहनचालकांना चौकीमध्ये बोलावून केली जातेय दमदाटी!
वडखळच्या वाहतूक पोलीसांचा "आगावपणा" हा दिवसेंदिवस वाढतच चालला असून ड्युटी कशी करायची याबाबत येथील वाहतूक पोलीसांचे ज्ञान अद्यापही अपूरे असल्याचे दिसत आहे. एखाद्या वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केले तर नियमानुसार त्या वाहनावर पावती फाडून किंवा ऑनलाईन चलन पाठवून अथवा इतर मार्गाने कायद्याने कारवाई करणे हे क्रमप्राप्त आहे. परंतु येथील पोलीस वाहनचालकांना चौकीमध्ये बोलावून त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे मागत असल्याच्या अनेक वाहनचालकांच्या तक्रारी आहे.
चौक्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलीसांना सुगीचे दिवस!
वडखळ मार्गावर दोन पोलूस चौक्या आहेत, पण दोन्ही चौक्यांच्या आतील भागांत कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे याचा फायदा घेऊन वाहतूक पोलीसांनी वाहनचालकांची लूटमार सुरू ठेवल्याच्या अनेक वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वडखळ येथील वाहतुक पोलीस चौक्यांमध्ये व्हॉईस रेकॉर्डर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे, जेणेकरून वाहतूक पोलीस वाहनचालकांसोबत कशा प्रकारे "गोड" भाषेत बोलतात ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण पाहता येईल!
"न्यूज २४ तास मराठी" ची इन्व्हेस्टिगेशन टीम लवकरच वाहतूक पोलीसांचा पर्दाफाश करणार!
वाहतूक पोलीस वाहनचालकांकडून हफ्ते का घेतात? त्यांना प्रामाणिकपणे काम करता येत नाही का? डिपार्टमेंट कडून मिळणाऱ्या पगारामध्ये त्यांना त्यांच्या कुटूंबाचा खर्च भागविता येत नाही का? दमदाटी करून वाहनचालकांकडून पैसे मागणे म्हणजे लूटमार करणे असा अर्थ होत नाही का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित झाल्यामुळे "न्यूज २४ तास मराठी" च्या इन्व्हेस्टिगेशन टीम ने भ्रष्ट वाहतुक पोलीसांच्या विरोधात हालचाल सुरू केली असून याबाबत पाठपुरावा करून येथील भ्रष्ट वाहतुक पोलीसांविरूद्ध कारवाई करण्याचे नियोजन आहे.