पाटणूस जि.प. शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

कोविड काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी,विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षामध्ये अंगणवाडीतून इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करून घेण्याच्या उद्देशाने शासनाच्या धोरणानुसार रायगड जि.प.शाळा पाटणूस या शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या वतीने जय्यत तयारीही करण्यात आलेली होती. यावेळी अंगणवाडीतून शाळेत दाखल होणाऱ्या मुलांची जिरेटोप, फेटे बांधून, प्रभातफेरीच्या माध्यमातून गावामधून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन कडापे बिटाचे विस्तार अधिकारी नितीन ओव्हाळ साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत वेगवेगळे सात स्टाॅल आवश्यक साहित्यासह मांडण्यात आले होते. या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडे असणाऱ्या क्षमता आनंदमय वातावरणात कृतीयुक्त पद्धतीने तपासण्यात आल्या. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद तर पालकांच्या व उपस्थित मान्यवरांच्या चेहऱ्यावर कुतुहल जाणवत होते. अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी कशी करावी यासाठी सर्व साहित्याची ओळख प्रास्ताविकामधून श्री.राठोड सर यांनी पालकांना करून दिली. पाटणूस ग्रामपंचायतच्या सरपंच निलिमाताई निगडे व सदस्य चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते आदिती म्हामुणकर, तुषार कामथेकर, कनिष्क भिलारे, रामराजे रांधवण या दाखलपात्र विद्यार्थ्यांना पूर्वतयारी साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेचा विकास व गुणवत्ता वाढीसाठी ग्रामस्थ पाटणूस सर्वतोपरी सहकार्य करतील असे माजी सरपंच विजय म्हामुणकर यांनी सांगितले. शाळेतील विविध उपक्रम व गुणवत्ता याविषयी पत्रकार आरती म्हामुणकर यांनी त्यांचे अनुभव सांगत कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याठी स्वयंसेवक म्हणून अंगणवाडी सेविका बेलोसे, दळवी, पडवळ, मंदाताई गायकवाड, उपक्रमशील शिक्षक इरेवाड सर, सुर्वे मॅडम, बंडगर सर, जाधव सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.खटके सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश चाळके, सदस्य वनिता मरगळे, जान्हवी म्हामुणकर, पत्रकार आरती म्हामुणकर यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बंडगर सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Popular posts from this blog