जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज पालखी भक्तांना दर्शनासाठी मार्गस्थ
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे शहाराची ग्रामदैवता श्री. जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांची पालखी रविवार 17 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. जोगेश्वरी मंदिरातून निघून संपूर्ण शहरातील भक्तांना दर्शनासाठी मार्गस्थ झाली.
नागोठणे शहराची ग्रामदैवता श्री. जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराजांची चैत्र पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी साजरा होणारा पालखी सोहळा या वर्षी रविवार 17 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. विधिवत पुजा करून जोगेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र जैन,विश्वस्त दिलीप टके,देवीचे भक्त मधुकर पोवळे,जि.प.सदस्य किशोर जैन,सरपंच डॉ.मिलिंद धात्रक,उत्सव कमिटीचे अध्यक्ष नितिन राऊत, उपाध्यक्ष रूपेश नागोठणेकर,सचिव मंगेश कामथे,खजिनदार प्रथमेश काळे,माजी अध्यक्ष- हरिष काळे,विलास चौलकर व बाळासाहेब टके यांच्यासह ट्रस्ट व उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी-सदस्य,ग्रामस्थ व भक्तगणांच्या उपस्थितीत देवीचे मुखवटे सजवलेल्या पालखीत विराजमान करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांच्या आताषबाजी, ढोल ताशांच्या गजरात,‘‘श्री. जोगेश्वरी माते की जय,भैरवनाथ महाराज की जय’’च्या जयघोषात, गोंधळी, वारकरी भजन मंडळ तसेच हजारो भक्तगणांच्या साथीने पालखी शहरामध्ये भक्तांना दर्शन देण्यासाठी मार्गस्थ झाली. सदरील पालखीच्या स्वागतासाठी शहरातील भाविकांनी घरासमोर मंडप, पताका, विद्युत रोषणाई,रांगोळी काढल्या असून ही पालखी ग्रामपंचायत कार्यालय, बंगले आळी, खालची आळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दोन्ही कोळीवाडे,छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठ,गांधी चौक,गवळ आळी, मराठा आळी, कुंभारआळी, प्रभूआळी, आंगरआळी, जोगेश्वरी नगर, रामनगर, बाळासाहेब ठाकरे नगर तसेच खडकआळी परिसरातील आपल्या भक्तांना दर्शन देऊन साधारण दोन दिवसांनी मंदिरात आगमन होणार असल्याची माहिती उत्सव कमिटीच्या वतीने सचिव मंगेश कामथे यांनी दिली.