रायगड जिल्ह्यात बोगस पत्रकारांचा धुमाकूळ!
'डिजीटल मिडीया'च्या नवशिक्या संपादकांनी केलीय ओळखपत्रांची खैरात
'न्यूज पोर्टल'च्या पत्रकारांच्या ओळखपत्रांवर 'R.N.I.' नंबरचा अनधिकृतपणे उल्लेख!
रोहा : समीर बामुगडे
पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते! परंतु आजच्या परिस्थितीमध्ये अनेक नवशिक्या व अज्ञानी संपादकांनी तर "पत्रकारिता" ह्या शब्दाची व्याख्याच बदलविण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे!
अनेक ठिकाणी नवीन न्यूज पोर्टल सुरू, त्यांपैकी ९९% अनधिकृत!
रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही उत्साही व अतिउत्साही संपादकांनी स्वतःचे न्यूज पोर्टल सुरू केलेले आहेत. त्यांपैकी ९९% न्यूज पोर्टल्स अनधिकृत आहेत. कारण नोंदणीची प्रक्रीया काय असते, हे देखील त्यांना माहिती नाही. "उद्यम आधार सर्टिफीकेट" काढली म्हणजे नोंदणी झाली, असा काही नवशिक्या संपादकांचा खुळा समज झालेला असून काही अज्ञानी संपादकांनी तर नवीन पत्रकार तयार करू त्यावर R.N.I. नंबरचा उल्लेख केलेला आहे, हा तर अत्यंत हास्यास्पद विषय आहे!
आर.एन.आय. (R.N.I.) चा अर्थ काय? न्यूज पोर्टल/डिजीटल मिडीयाशी आर.एन.आय. चा संबंध आहे का?
सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आर.एन.आय. (R.N.I.) चा अर्थ "रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया" असा आहे! R.N.I. या नावाचा अर्थ ह्या नावामध्येच आहे. अर्थात, आर.एन.आय. नंबर हा फक्त वृत्तपत्रांशीच संबंधीत आहे. न्यूज पोर्टल, डिजीटल मिडीयाशी आर.एन.आय. नंबरचा काडीमात्रही संबंध नाही! पण असे असताना देखील काही "न्यूज पोर्टल"च्या नवशिक्या संपादकांनी पत्रकारांच्या ओळखपत्रांवर R.N.I. नंबरचा उल्लेख करून अनेक ठिकाणी ओळखपत्रांची खैरात करून अक्कलेचे तारे तोडलेले आहेत. या नवशिक्या संपादकांना R.N.I. चा अर्थ माहितीच नाही हे स्पष्ट झालेले आहे.
बोगस ओळखपत्र वापरणाऱ्या न्यूज पोर्टलच्या पत्रकारांपासून सावधान!
रायगड जिल्ह्यात अनेकांनी न्यूज पोर्टल (वेब न्यूज) सुरू करून ओळखपत्रांची खैरात करून स्वतःचे नवीन पत्रकार नियुक्त केलेले आहेत. विशेष म्हणजे न्यूज पोर्टलच्या अनेक पत्रकारांच्या ओळखपत्रांवर आर.एन.आय. नंबरचा उल्लेख आहे. परंतु हा उल्लेख अनधिकृत असून अशा प्रकारचे ओळखपत्र वापरणारे पत्रकार हे "बोगस पत्रकार" आहेत. अशा बोगस पत्रकारांविरूद्ध कारवाई होण्याच्या मार्गावर आहे. या बोगस पत्रकारांमुळे ब्लॅकमेलींग व लुटमारीचे प्रकार वाढण्याची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारच्या बोगस पत्रकारांपासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे!