द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा
कोलाड/रोहा : सदानंद तांडेल
8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन! या दिनाचे औचित्य साधून द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी इयत्ता नववीच्या कु. प्रांजल निळेकर हिने जिजाऊ, कु. तनवी शेडगे हिने डॉ. आनंदीबाई जोशी व कु. सानिका साळुंखे हिने सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेतून कविता सादर केल्या. यावेळी सौ. संजाली सानप यांनी
रोज एक नेम कर | आरशात पाहून स्वतःला म्हण तुझ्यासारखी नाही कोणी | सावळी स्थुल वा असो ठेंगणी | तू सुंदर तू देखणी | लाजायच नाही देहाला | मनाशी हे ठाम कर |रोज एक नेम कर| स्वतःवर प्रेम कर |
या स्वतः रचलेल्या कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच सौ. जयश्री खोडे यांनी आधुनिक जगातील स्त्री कशी कर्तृत्ववान आहे हे उदाहरणासह पटवून सांगितले. पुरुषांमध्ये पर्यवेक्षक श्री मारुती देशमुख, श्री पुरुषोत्तम जाडकर यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व शिक्षक उपस्थित होते. यावेळी मंचकावर नवनियुक्त उपमुख्याध्यापक श्री शकील मोरवे हे उपस्थित होते. महिला दिनाचे औचित्य साधून श्री दिनकर पाटील यांनी सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन विद्यालयातील कला विभागाचे प्रमुख श्री संतोष सूर्यवंशी यांनी केले. तसेच सूत्रसंचालन कु. श्रुती देशमुख यांनी केले.