विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे पथक भुवनेश्वर ओरिसा येथे चक्रीवादळ प्रशिक्षणासाठी रवाना
अलिबाग : जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूवनेश्वर (ओरीसा) येथे जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले आहे. ओडिसा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (OSDMA) महापूर व चक्रीवादळाच्या अनुषंगाने पूर्वतयारी व धोका सौम्यीकरणाच्या उपाययोजना केलेल्या आहेत. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर दरवर्षी येणाऱ्या चक्रीवादळामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वतयारी करण्यास अनुभवी आहेत. रायगड जिल्ह्यास मागील सलग दोन वर्षी निसर्ग व तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला असल्याने प्रशिक्षणाच्या माध्यमातून येणाऱ्या महापूर व चक्रीवादळास सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज राहील, त्यामुळे ओरीसा राज्याने महापूर व चक्रीवादळाच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 50 प्रशिक्षणार्थींना महापूर व चक्रीवादळाबाबतचे प्रशिक्षण मधूसूधन दास विभागीय वित्त व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (MDRAFM), चंद्रसेखरपूर, भुवनेश्वर, ओडिसा येथे दि.15 ते 17 मार्च 2022 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे.
या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील पोलीस विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद, ग्रामविकास विभाग, विद्युत वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड इ. विविध विभागाचे 50 अधिकारी सहभागी झालेले असून ते भुवनेश्वर येथे प्रशिक्षणासाठी पोहोचलेले आहेत.यानंतर एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, अग्निशमन दलाचे स्वयंसेवक, एन.एस.एस. विद्यार्थी इत्यादिंचा समावेश असलेले 50 जणांचे पथक पाठविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग, होमगार्डस, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच असे 50 जणाचे पथक डिसेंबर 2021 मध्ये पाठविण्यात आले होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली आहे.