रोहा वनविभागात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रचंड भ्रष्टाचार!
निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे अधिकारी कारवाईच्या रडारवर
कामाच्या थर्ड पार्टी ऑडीटची मागणी
रायगड : न्यूज २४ तास इन्व्हेस्टिगेशन टीम
रोहा वन विभागांतर्गत रोहा तालुक्यातील काजू वाडी येथे वन बंधारा बांधकाम करणे हे काम सुरू आहे. या कामात बंधाऱ्याच्या कॉंक्रीट मध्ये मोठमोठे दगडाचे गोलटे टाकण्यात आले आहेत. आणि ते झाकण्यासाठी वरुन सिमेंट चा मुलामा दिलेला आहे. वापरण्यात आलेल्या कॉंक्रीटचा दर्जा अतिशय सुमार आहे.
या कामांवर देखरेख करण्यासाठी वनविभागाकडे स्थापत्य अभियंता नसताना दरवर्षी अशी कित्येक कोटी रुपयांची बांधकामे काढली जातात. निव्वळ भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने मंजूर केलेली बांधकामे करण्यासाठी वनविभागाकडे एक "पॉवर"फुल ठेकेदार आहे. तो वेगवेगळ्या रजिस्टर ठेकेदारांच्या नावाने ठेका घेतो.
लोणेरे येथे प्लांटेशन साठी चैन लींक फेन्सिंग करणे, कांदळे येथे प्लांटेशन साठी चैन लींक फेन्सिंग करणे, यशवंतखार येथे प्लांटेशन साठी चैन लींक फेन्सिंग करणे, बाहे येथे प्लांटेशन साठी चैन लींक फेन्सिंग करणे, बोंडशेत येथे प्लांटेशन साठी चैन लींक फेन्सिंग करणे आणि इतर अनेक लाखो-करोडो रुपयांची बांधकाम कामे उपवनसंरक्षक, वनविभाग रोहा यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आली आहेत.
रोहा वनविभागाअंतर्गत काजूवाडी येथील वनबंधारा बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदर भ्रष्ट कामाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी या रायगड जिल्ह्यातील विश्वसनीय संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडीट करून घ्यावे आणि सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय ठेकेदाराचे पैसे अदा करण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
दरवर्षी बांधकाम विभागासाठी लाखो रुपये रोहा वनविभागामार्फत खर्ची टाकले जातात. रोहा वनविभागाकडे बांधकाम विभाग नसताना केवळ भ्रष्टाचार करण्याच्या हेतूनेच ही कामे राबविली जातात. या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापत्य अभियंता कुणीही हजर नसतो. याविषयी नागरिकांनी वारंवार रोहा वनविभागाकडे तक्रार केली आहे. मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगनमताने भ्रष्ट कारभार सुरूच ठेवला आहे. या प्रकारामुळे आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांचीच उच्चस्तरिय चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.