माणगांव प्रभाग क्रमांक २ मध्ये सार्वजनिक स्वछतेवर अधिक भर देणार - नगरसेविका सुविधा खैरे
माणगांव : प्रमोद जाधव
माणगांव नगरपंचायत निवडणूकीचा निकाल लागून २ महिने उलटून गेले आहेत. मात्र प्रत्येक प्रभागातील नगरसेवक नगरसेविकांनी आपल्या कामाची चुणूक आपल्या प्रभागात दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्ष आघाडीचे नगरसेवक व नगरसेविका आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. यातून सत्ता असो किंवा नसो आम्ही खासदार सुनिल तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागाचा विकास करूच अशी खूणगाठ मनाशी बांधून माणगाव नगरपंचायत मधील राष्ट्रवादी नगरसेवकांकडून कामाची पद्धत अवलंबिली जात आहे. अशाच प्रकारे माणगांव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक २ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका सुविधा संतोष खैरे यांनी आपल्या प्रभागात कामाची सुरुवात केली आहे.या प्रभागात माणगांव मधील दत्तनगर, क्रांतीनगर, दत्तनगर पूर्व विभाग व मैत्रीपार्क व एकता नगरचा काही भाग समाविष्ट आहे. या मध्यातून फार वर्षापूर्वीचा जुना नाला आहे.
हा नाला दत्तनगर सार्वजनिक विहीर ते रविंद्र चिंचघरकर यांचे घर व चक्रपाणी चाळ या भागातून पुढे जाऊन पावसाळ्यात कालव्याला मिळतो. या नाल्यामध्ये कचरा जंगली झुडपे यांनी बरेच दिवसापासून आपले बस्तान बसविले होते. यामुळे डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि रोगराईला निमंत्रण या गोष्टी समोर येत असल्याने नगरसेविका सुविधा खैरे यांनी नगरपंचायत कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर नाल्याची साफ सफाई करून घेतली आहे.यामुळे पावसाळ्यातील पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छता देखील झाली आहे. नगरसेविका सुविधा खैरे यांनी आपल्या कामाची सुरुवात चांगल्या प्रकारे केल्यामुळे समस्त दत्तनगरवासीय व प्रभाग क्रमांक २ च्या मतदार नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून निवडून दिले आहे त्यांची सेवा व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे आपले परम कर्तव्य आहे व यानंतर प्रभाग क्रमांक २ मधील सार्वजनिक स्वछता व सार्वजनिक आरोग्य या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे नगरसेविका सुविधा खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.