रोहा नगरपालिकेतील शिक्षकांचे देव पाण्यात, कार्यालयातील पूजा-अर्चना वाया गेल्यामुळे शिक्षकही बनले खुळे?
प्रशासन अधिकारी यांची बढतीमुळे बदली
रोहा : प्रतिनिधी
रोहा नगरपालिकेत नगरसेवकांची मुदत संपली आहे. नगर पालिकेत प्रशासक नेमल्यामुळे अनेक शिक्षकांना बढतीचे डोहाळे लागले. शिक्षण समिती कार्यालयात पूजा-अर्चना केली की अशक्य कामे सुद्धा शक्य होतात. कार्यालयात फाईलींचा गठ्ठा जमू लागला. फाईलींमधील पाकीटामुळे कामाचे वजन वाढते. केलेली पुजा देवळापर्यंत पोचली या भ्रमात शिक्षक होते. प्रत्येकाचे पगार लाखाच्या घरात पोचणार होते. फाईली आणि पाकीटं वाढत चाललेली पाहून कार्यालयातील देव वेळ काढू लागला. जून मध्ये सगळ्यांना पुजेचा प्रसाद मिळणार होता. त्यामुळे पुजेचे स्वरुप देखील मोठे झाले. कार्यालयातील पुजारी स्वतःला देव समजू लागला. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडू पहात होती. अशीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.
आणि अचानक... प्रशासन अधिकारी यांची बढतीची ऑर्डर आली. त्यांना आपल्या स्वच्छ चारित्र्याचा साक्षात्कार झाला. रोह्यातील पदभार सोडताना त्यांनी उत्तरपुजा घाईघाईने उरकली. पाकीटे देणारे तोंडघशी पडल्याचे बोलले जात आहे.
नवीन प्रशासन अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला, जून्या पुजेचा प्रसाद नवीन प्रशासन अधिकारी देतील असे पुजाऱ्यांनी सांगितले. पाकीटे मुरुड च्या लॉकर मध्ये सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे, तर काहींच्या मते पुजा अर्चना मध्ये पाकीटे खर्ची पडल्याची शक्यता आहे. मात्र सद्या शिक्षकच "खुळे" बनल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.