बनावट पॅनकार्ड व तोतया इसम उभा करून जमिनीची विक्री
माणगांव तालुक्यात निजामपूर विभागात भु-माफियांचा सुळसुळाट
माणगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल
माणगांव : प्रमोद जाधव
संपूर्ण माणगांव तालुक्यात भु-माफियांच्या सुळसुळाट वाढला असून जमिनी खरेदी विक्री करताना शेतकऱ्याच्या कायदेविषयक अज्ञानाचा फायदा घेत अनेक भू-माफिया जमिनींचे गैरव्यवहार करीत आहेत. हळू हळू एक-एक प्रकरणे समोर येत असून या गैरव्यवहार करणाऱ्या काही भू-माफियांवर माणगांव पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तर काही सहज कायद्याच्या कचाट्यातुन बाहेर पडून पुन्हा खुलेआम असेच बोगस व्यवहार करत आहेत. अनेक प्रकल्पांकरिता जमिनी संपादित केल्या जात असल्याने जमिनीचा मोबदला दर देखील चांगल्या प्रकारे मिळत असल्याने भूमाफिया जोमात आणि गरीब शेतकरी बिचारा कोमात! अशी अवस्था माणगांव तालुक्यात झाली आहे.अश्या जमीन खरेदी विक्री गैरव्यवहारामुळे माणगांव तालुका जमिनींच्या बोगस व्यवहाराबाबतीत अव्वलस्थानी जात आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ एप्रिल २०१३ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय येथे फिर्यादी यतीन उल्हास टूमणे, वय ४९ वर्ष, रा. काकरतळे, ता. महाड यांचे काका अरविंद विश्वनाथ टूमणे व उल्हास शंकर टूमणे हे जमिनीचे मूळ मालक असून जमीन मालक अरविंद टूमणे हे २००८ साली मयत असताना ते जिवंत आहेत असे दाखवून त्यांच्या ठिकाणी तोतया इसम उभा करून बनावट पॅनकार्ड त्याच्या नावे तयार केले. आरोपी मिलिंद चंद्रकांत फोंडके, रविंद्र वसंत भोईर, निसेल रविंद्र भोईर, नितीन चंद्रकांत फोंडके, केशव गोविंद ओक, आसिफ याकूब दळवी, सखाराम धोंडू मांडवकर व अजून दोन इसम यांनी तोतया इसम हाच जमिनीचा मूळ मालक आहे सांगून निजामपूर विभागातील जिते ग्रामपंचायत हद्दीतील गाव मौजे साखळेवाडी येथील सर्व्हे नं.५६ चे क्षेत्र ५-२०-० या जमिनीची विक्री आरोपी यांनी संगनमत करून कट रचून स्वतःच्या फायद्याकरिता करून फिर्यादी टूमणे कुटुंबीयांची फसवणूक केली आहे. याबाबत माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. ५५/२०२२, भा. दं. वि. सं. क. ४१९, ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब), ३४, सह नोंदणी अधिनियम २००८ चे कलम ८२ प्रमाणे करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार सूर्यकांत भोजकर करीत आहेत.