माणगांवमध्ये कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने रद्द करा - देवेंद्र गायकवाड
माणगांव : प्रमोद जाधव
माणगांव तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांकडून सर्वसामान्य ग्रामीण जनतेची होणारी पिळवणूक थांबावी, हेलपाटे थांबावे याकरिता सदर मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने रद्द करावे याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी तहसीलदार माणगांव व दुय्यम निबंधक नोंदणी शाखा माणगांव यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात वारंवार लेखी व मौखिक तक्रारी करून देखील माणगांव तालुक्यातील स्टॅम्प व्हेंडर हे मुद्रांकाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून तालुक्यातील ग्रामीण जनतेची पिळवणूक करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
माणगांव तालुक्यात एकूण ५ परवानाधारक मुद्रांक विक्रेते आहेत त्यापैकी ४ मुद्रांक शुल्क विक्रेते कार्यशील आहेत आणि जे कार्यशील आहेत त्यामधील दोनच मुद्रांक विक्रेते व्यवस्थित म्हणावा किंव्हा ग्रामीण जनतेची अडचण ओळखून थोड्याफार प्रमाणात मुद्रांक विक्री करीत आहेत. हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये अजूनही विशेष प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अशा प्रकारे मुद्रांक असून देखील कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या मुद्रांक शुल्क विक्रेत्यांवर शासनाने कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत व नवीन परवाने काढावेत जेणेकरून अशा मुजोर मुद्रांक विक्रेत्यांना जरब बसून सुशिक्षित बेरोजगार युवकांना याचा फायदा होऊ शकतो. जनतेची पिळवणूक करणाऱ्या अशा मुद्रांक शुल्क विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत अथवा यांनी मुद्रांकांचा व्यवस्थित साठा ठेवून जनतेची पिळवणूक थांबवावी असा आशय निवेदनात नमूद आहे.
बहुतांशी नागरिक हे माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागातुन दररोज तालुक्याच्या ठिकाणी येऊन पैशांचा नाहक अपव्यय करत आहोत व त्यांना मुद्रांक खरेदीसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्याकरिता एकतर ह्या मुद्रांक विक्रेत्यांना मुबलक साठा ठेवण्यास सांगावे व ग्रामीण सर्वसामान्य जनतेची पिळवणूक थांबवावी किंवा तसे होत नसल्यास अशा मुजोरगिरी करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत अशा प्रकारची मागणी देवेंद्र गायकवाड यांच्याकडून निवेदनाच्या माध्यमातून माणगांव महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे व असे न झाल्यास मनसे स्टाईल दाखविण्यात येईल असा इशारा देखील देवेंद्र गायकवाड यांनी दिला आहे.