रोहा नगर पालिका शाळेच्या शिक्षकांचे गोपनीय अहवाल प्रशासन अधिकाऱ्यांनी थांबविले!
कार्यालयात "पुजा-अर्चना" केल्यावरच सही करणार?
रोहा : किरण मोरे
रोहा नगर पालिकेच्या काही शिक्षकांना बढतीचे आणि पदोन्नतीचे डोहाळे लागले आहेत. काही शिक्षकांची पगारवाढ रखडली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन आदेशानुसार ३३ वर्षे सेवा दिलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे काही शिक्षकांच्या डोक्यावर अकाली निवृत्तीची टांगती तलवार आहे. आता शिक्षकांना निवृत्तीपुर्वीच भेटेल तेव्हढं पदरात पाडून घ्यायचे आहे. काही शिक्षकांचे पगार लाखाच्या पल्याड गेलेत, तर काहींना लाखांचे डोहाळे लागले आहेत.
मात्र त्यासाठी प्रशासन अधिकाऱ्यांनी शिक्षकांचा गोपनीय अहवाल चांगला लिहिणे गरजेचे आहे. या शिक्षकांच्या कमजोरीचा नेहमीप्रमाणे कार्यालयात भाव ठरला आहे. चांगल्या "शेरा" सोबत इतरही रखडलेल्या फाईलींवर सह्यांसाठी बोली लागल्याची चर्चा आहे.
पुजेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. भंडारा उधळला जातोय. देव दर्शन द्यायला आतूर झालाय. "मुरुडच्या" समुद्र किनारी जागा निश्चित केलीय. कुंडलिका नदीतून अरबी समुद्रात स्थलांतरित झालेल्या, मुरुडच्या "पाखरांची" किलबिल मन मोहरुन टाकतेय. संबळ नाद धरु लागलीय, भक्तांचे पाय थिरकू लागलेत. पायातले घुंगरू "खुळे-खुळे" वाजू लागलीत. सगळीकडे मंगलमय (?) वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
प्रशासन अधिकाऱ्यांनी सगळ्यांना चांगला शेरा दिल्यावर सगळ्यांच्याच खात्यात सहा आकडी पगार जमा होणार आहे. त्यामुळे आता शिक्षक नेत्यांच्या घरी पाणी भरण्याऐवजी पुर्ण वेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.