'पॉस्को' कंपनीमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
माणगांव : प्रमोद जाधव
पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड या आघाडीच्या पोलाद प्रक्रीया कंपनीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध खेळ आणि मनोरंजक उपक्रमांचा समावेश होता आणि त्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती. समाजाच्या प्रगतीत महिलांचा मोलाचा वाटा आहे; या विचाराच्या आधारावर पोस्कोने जागतिक महिला दिन साजरा केला आणि संबंधित कार्यक्षेत्रात महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस समर्पित केला.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कार्यक्रम आयोजक समितीद्वारे महिलांसाठी मनोरंजक खेळ, स्पर्धा आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कारही करण्यात आला, त्याचप्रमाणे सर्व महिला कर्मचाऱ्यांना पॉस्को महाराष्ट्र व्यवस्थापनातर्फे प्रत्येकी एक असे कढीपत्ता, गवती चहा, पानवेल आणि कोरफड यांसारख्या घरातील दैनंदिन महत्त्व लक्षात घेऊन औषधी वनस्पती देखील भेट म्हणून देण्यात आल्या. या प्रसंगी पॉस्को व्यवस्थापनाने महिलांसाठी आर्थिक व्यवस्थापन आणि विविध सरकारी योजना जसे की सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना यांसारख्या विविध योजनांचे जनजागृती सत्राचे तसेच विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय कमी कालावधीसाठी पण मोठ्या कारणासाठी एक व्यासपीठ निर्माण करून महिला कर्मचाऱ्यांची मने ताजी करण्याचा हा व्यवस्थापनाचा प्रयत्न होता.
यावेळी महिला कर्मचाऱ्यांना संबोधित करताना पॉस्को व्यवस्थापनाने सांगितले कि, गेली काही वर्षे कोविड-१९ मुळे हा उपक्रम साजरा करणे आम्हा सर्वांसाठी कठीण होते, परंतु सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांमध्ये शिथीलता दिल्यामुळे यावर्षी जागतिक महिला दिन साजरा करण्याचे ठरवले. तसेच व्यवस्थापनाने सांगितले कि, पॉस्को महाराष्ट्र स्टील साठी महिला कर्मचारी महत्त्वाच्या आहेत आणि या संस्थेतील त्यांच्या योगदानाचे कौतुक करताना आम्हाला आनंद होत आहे असे पॉस्को प्रशासनाने म्हटले आहे.