पॉस्को स्टील कंपनी बाहेरील उपोषणात्मक आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता

पॉस्को कंपनीतील इजिटेक कामगारांच्या आमरण उपोषणा सोबतच मोकाशी परिवाराचे देखील उपोषण

माणगांव : प्रमोद जाधव

माणगांव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील पॉस्को कंपनी अंतर्गत इजिटेक या कंत्राटी कंपनीच्या कामगारांनी दि. १४ मार्च पासून पॉस्को कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषणास सुरुवात केली.

गेल्या ७ ते ८ वर्षांपासून कंपनी अ‍ॅक्टनुसार बऱ्याच सुविधांपासून येथील कामगारांना वंचित ठेवले होते. त्यांच्या न्याय हक्कासाठी कामगारांनी दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी इजिटेक कंपनी व्यवस्थापकांकडे  मागण्या केल्या होत्या. तेथील काही मागण्या दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी मान्य करण्यात आल्या. परंतु, त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने काही दिवसातच सूड भावनेने दि. ७, १३, २० डिसेंबर रोजी १७ कामगारांना कामावरून निलंबित केले. सध्या कामगारांना बेसिक व महागाई भत्याच्या ५०% पगार देत आहेत. कंपनीने कामगारांना कोणताही गुन्हा नसताना कामावरून तडकाफडकी निलंबीत केले. याचा जाब कामगारांनी विचारला असता त्यांना खोटे दोषारोपपत्र देण्यात आले. मात्र त्या दोषारोपपत्र मध्ये दिलेली वेळ यांतील कामगार यांची कामाची वेळ नव्हती. मग हे विनाकारण दोषारोप का केले. निलंबीत केल्यानंतर कामगारांनी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. यावर कामगार न्यायालयाने दि. २९ डिसेंबर २०२१ रोजी आदेश काढून निलंबित १७ कामगारांना कामावर परत हजर करून घ्या व ज्या कारणांसाठी निलंबित केले आहे त्याची चौकशी प्रक्रीया करा असे कंपनी व्यवस्थापनाला सांगितले होते. परंतु, कंपनीने या आदेशाकडे कानाडोळा करत कामगारांना कामावर अद्यापपर्यंत रुजू करून घेतले नाही.

कंपनीने कामगाराना कायमचे घरी बसविण्याचे ठरविले असून यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपसमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे कंपनीने कामगारांना पूर्वरत रुजू करावे व झालेले आर्थिक नुकसान भरून द्यावे अशी मागणी असल्याचे उपोषणकर्त्या कामगारांनी ठेवल्या  आहेत.

या उपोषणाचा आजचा १७ मार्च रोजी तिसरा दिवस यामध्ये दोन उपोषण कर्त्या कामगारांची शारीरिक स्थिती ढासळल्याने त्यांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते उपचार घेत आहेत.कोकणासह रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला आहे.आणि त्यातच विना अन्न पाणी अशी दोन प्रकारची उपोषणात्मक आंदोलने माणगाव विळे भागाड एम आय डी सी मधील पॉस्को कंपनी च्या गेटबाहेर सुरू आहेत.

मोकाशी परिवाराचे न्यायासाठी पॉस्को कंपनीच्या गेटसमोर दुसरे उपोषण

विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनीसमोर निजामपूर विभागातील येरद येथील मोकाशी परिवार आपल्या न्याय हक्कासाठी दि. १४ मार्च पासून बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत.

प्रभाकर मोकाशी हे पी.एस.पी. तर्फे पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होते. काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण होऊन उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधन झालेल्या पी.एस.पी. ग्रुपच्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला ज्याप्रमाणे आर्थिक सहाय्य, वैद्यकीय सहाय्य आणि परिवारातील एकाला नोकरीत सामावून घेतले त्याप्रमाणे व नुकसान भरपाई दिली त्याप्रमाणे मोकाशी परिवाराला सुद्धा न्याय द्यावा यासाठी मोकाशी परिवार उपोषणाला बसले असल्याची माहिती प्रमिला प्रभाकर मोकाशी व प्रवीण प्रभाकर मोकाशी यांनी पत्रकारांना दिली आहे.

१७ मार्च रोजी या आंदोलनाचा तिढा चिघळनार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांंना सुरुवातीपासून साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महाड विधानसभा प्रमुख चंद्रशेखर उर्फ बाबूशेठ खानविलकर निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी सोबत मनसे चे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी देखील पॉस्को कंपनी बाहेरील गेटसमोर उपोषणकर्त्या कामगारांची व मोकाशी परिवाराची भेट घेतली व उपोषणकर्त्यांना सशर्त पाठींबा दिला आहे व यासंदर्भात पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी प्रशासनाने व व्यवस्थापकीय मंडळाने देखील प्रेसनोट जारी करून आपले म्हणणे व्यक्त केले आहे. त्यामध्ये पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनी कडून सांगण्यात आले आहे की, अलीकडे पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रा. लि मधील कंत्राटी कंपनी अर्नेस्ट ग्लोबलायझेशन इंडिया प्रा. च्या १७ कामगारांच्या निलंबनाच्या संदर्भात खोटा आणि बदनामीकारक मजकूर समाज माध्यमांवर व्हायरल करून जनमाणसाची हेतुपुरस्सर दिशाभूल करण्यात येत आहे. त्यासंबंधी सदरहू प्रेसनोट जारी करत आहोत. 

आम्ही सांगू इच्छितो की अर्नेस्ट ग्लोबलायझेशन टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि “ईजि टेक” ही प्रतिष्ठित दक्षिण कोरियन तंत्रज्ञान कंपनीची भारतीय उपकंपनी आहे. त्यांना पोस्को कंपनी अंतर्गत विशिष्ट तांत्रिक कामांसाठी करार देण्यात आला आहे. सदरहू, करारानुसार, त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा पोस्को कंपनीस कोणताही अधिकार नाही. 

कामगार समस्येच्या संदर्भात, ईजी टेक कंपनीला या १७ कामगारांना निलंबित करावे लागले कारण कारखान्यात त्यांची उपस्थिती ईजि टेकच्या शिस्त आणि कामकाजाच्या हितासाठी हानिकारक होती, कारण सहकारी कामगारांना धमकावणे, व्यवस्थापन कर्मचार्‍यांचा अपमान करणे आणि इतर कृत्यांसह गैरवर्तनाचे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत आणि त्यामुळे त्यांना कामातून निलंबित करण्यात आले असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

या सर्व १७ कर्मचाऱ्यांना दोषारोपपत्र जारी करण्यात आले असून चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून प्रचलित कायद्यानुसार चौकशी करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना प्रचलित कायद्यानुसार निलंबन/निर्वाह भत्ता दिला जात आहे. मात्र, सदर कर्मचाऱ्यांनी कायदेशीर व घटनात्मक उपाय न पाळता बेमुदत उपोषण केले आहे आणि तरीही सदर विषयी आम्ही स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत आहोत. आम्ही स्थानिक प्रशासनाला विनंती करतो की या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर उपोषण सोडण्यासाठी योग्य ती कारवाई किंवा समुपदेशन करावे कारण सद्यस्थितीत आपल्या परिसरात उष्णतेची लाट आहे ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होऊ नये असे आम्हांस वाटते.

मागील काही काळात व्हाट्सअप, यु ट्यूब व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि प्रिंट आणि दृक्श्राव्य मीडिया प्लॅटफॉर्मवरील बातम्या ज्या पद्धतीने सादर केल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन कंपनीच्या वतीने तमाम जनतेस करण्यात येत आहे अशी प्रतिक्रिया व माहिती पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनी व्यवस्थापन व पॉस्को प्रशासनाकडून प्रसारमाध्यमांंना देण्यात  आली आहे.


"पॉस्को स्टील अंतर्गत ई जी टेक कंपनीच्या कामगारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या पाठीशी निजामपूर विभाग व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाम आहे.वेळ पडल्यास खासदार सुनील तटकरे पालकमंत्री आदीती तटकरे  आमदार अनिकेत तटकरे यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार कामगारांच्या न्याय व हक्कासाठी आंदोलनलनाचा दिशा बदल किंवा तीव्रता वाढविण्याची वेळ आली तरी ते देखील करू..याची दखल इजि टेक कंपनी व पोस्को प्रशासनाने घ्यावी."

 - संदीप जाधव, अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस निजामपूर विभाग


"अतिशय भयानक परिस्थिती आहे. इथे उपोषणास बसलेले युवक त्यांची विझलेली चूल पुन्हा पेटविण्यासाठी धडपड करत आहेत मात्र कंपनी प्रशासनाला याचे काहीच पडलेले नाही. ४ आंदोलकांची शारीरिक प्रकृती ढासळल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन देखील याची दखल घेत नाही याच्यासारखे दुर्दैव निजामपूर विभागाचे असू शकत नाही."

- सागर खानविलकर, कार्यकर्ता : राष्ट्रवादी युवक काँग्रेस निजामपूर विभाग


"गेले तीन दिवस हे उपोषण सुरू आहे. ४ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.हा स्थानिक भूमीपुत्रांचा प्रश्न आहे. कंपनीने अद्याप पर्यंत या गोष्टीची दखल न घेतल्याने आम्ही कंपनीचा निषेध करतो आहोत. पॉस्को अंतर्गत असणाऱ्या इजिटेक कंपनीने ह्या १७ कामगारांना जाणून-बुजून दिलेला त्रास आहे. तुम्ही जर आमच्या कामगारांना त्रास देत आहात तर आम्हालाही माहीत आहे तुम्हाला कसा त्रास द्यायचा.?? स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी जसे मनसे ने काही वर्षांपूर्वी या कंपनीविरोधात आंदोलन केले होते तसे आंदोलन उभारू आणि काही वेळातच पोस्को आणि इजि टेक कंपनीला आम्ही प्रत्युत्तर देऊ!"

- देवेंद्र गायकवाड,  जिल्हाध्यक्ष : मनसे दक्षिण रायगड

Popular posts from this blog