देवेंद्र गायकवाड यांचा वाढदिवस नाविन्यपूर्ण उपक्रमांनी उत्साहात साजरा
माणगाव : प्रमोद जाधव
मागील अनेक वर्षे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात सतत कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांचा वाढदिवस २६ फेब्रुवारी रोजी माणगांव तालुक्यातील निजामपूर शहरातील एस टी स्टँड समोर रसिकभाई मेहता पटांगणात मोठ्या उत्साहात व नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
मागील दोन वर्षे देशावर व जगावर असलेले कोरोना महामारी व लॉक डाऊन च्या संकटामुळे देवेंद्र गायकवाड यांनी दोन वर्षे वाढदिवस साजरा न करता विविध वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, स्थलांतरित कामगार, रोजंदारी कामगार यांना मदत वाटप करत साजरा केला होता. मात्र यावर्षी लॉकडाऊन नियमात शिथिलता आल्यानंतर व कोरोना चे सावट हळू -हळू कमी झाल्याने देवेंद्र गायकवाड यांच्यावर प्रेम करणारे मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हितचिंतक व मित्रपरिवार यांनी यावर्षी गायकवाड यांचा वाढदिवस नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला व साजरा केला देखील!
यावर्षीच्या देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने २६ फेब्रुवारी रोजी निजामपूर येथे महाराष्ट्रातील थोर प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण ह.भ.प. श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या धर्मपत्नी महिला भूषण ह.भ.प. सौ. शालिनीताई निवृत्त महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते व निजामपूर विभागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रुग्णांना फळवाटप देखील करण्यात आले व निजामपूर विभागातील विविध अदिवासी पाड्यांवर जाऊन खाऊ वाटप करण्यात आला. तर गोरेगाव विभागात मनसैनिकांनी विविध झाडांची रोपे वाटप करून "झाडे लावा, झाडे जगवा चा संदेश दिला.
याच वाढदिवस सोहळ्यानिमित्ताने निजामपूर येथे सायंकाळी ४ वाजता विशेषकरून महिलांकरिता "खेळ पैठणीचा" कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात निजामपूर शहर व निजामपूर विभागातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला. राजकारणी असूनही राजकारणापलीकडे जाऊन काम करणारे व्यक्तिमत्व देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा तसेच मुंबई, नवी मुंबई येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध पदाधिकारी व मनसैनिक तसेच माणगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देवेंद्र गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शविली. अशा प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात व नाविन्यपूर्ण उपक्रमानी साजरा करण्यात आला.