मुदतीपूर्वीचा सरपंचवरील अविश्वास ठराव फेटाळला, खारापटी विभाग राष्ट्रवादीला हादरा!
रोहा : किरण मोरे
रोहा तालुक्यात सर्वाधीक प्रबळ असलेला राष्ट्रवादी पक्ष पंचायत राज प्रक्रियेत वारंवार फसत आला. प्रतिष्ठेची असलेल्या किल्ला ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीने आणलेला ठराव भाजपा विरोधकांनी उधळून लावला, ही घटना स्मरणीय असतानाच शिवसेनेकडे असलेल्या निडीतर्फे अष्टमी ग्रामपंचायतीतही राष्ट्रवादीने स्वतःचीच फसगत करून घेतली. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या सरपंच स्वामीनी डोलकर यांच्याविरुद्ध सोमवार ७ मार्च रोजी अविश्वास ठराव दाखल करण्याचा प्रस्ताव निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे सादर केला. त्यानुसार शुक्रवार ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा घेण्याची नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत चांगलीच राजकीय धूळवड उडाली. अविश्वास ठराव मंजूर होणार का, नेमकं काय होणार ? याकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र राष्ट्रवादीने स्वतःचीच मोठी फसगत करून घेतल्याचे समोर आले. मुदतीपूर्वीच्या सरपंचावरील अविश्वास ठराव अखेर तहसीलदार कविता जाधव यांनी फेटाळला आणि राष्ट्रवादीला किल्लानंतर मोठा जोर का झटका बसला. दरम्यान, विभागीय शिवसेनेने आपल्या सरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळल्याने मोठा जल्लोष केला. अविश्वास ठराव फेटाळण्याच्या सबंध प्रक्रियेत सेनेचे युवानेते अजित पोकळे किंगमेकर ठरले, पुन्हा एकदा सत्याचा विजय ठरला, एक सामान्य व्यक्तीने राष्ट्रवादीला पुन्हा एकदा धूळ चारली अशी प्रतिक्रिया अजित पोकळे यांनी सलाम रायगडला दिली, तर राष्ट्रवादीला अतिघाई नडली, त्यामुळेच फसगत झाली अशी तुफान चर्चा सध्या रोहा राजकारण सुरू आहे.
निडीतर्फे अष्टमीवर शिवसेनेची सरपंच सत्ता आहे, खारापटी विभागात राष्ट्रवादीचे प्रभावी नेतेगण असताना ग्रामपंचायतीवर सेनेने भगवा फडकविला, याचे शल्य कायम नेतेगणांना आहे, निवडणुकीत राष्ट्रवादीला ४, सेनेला ३ भाजपाला २ जागा मिळाल्या होत्या, त्यातूनच भाजपच्या मदतीने सेनेच्या स्वामीनी डोलकर सरपंच म्हणून विराजमान झाल्या, त्यानंतरच्या राजकीय घडामोडीत भाजपाचे २ सेनेच्या एक सदस्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला, राजकीय नाट्यातून सेनेकडे अवघे सरपंचासह १ सदस्य राहिले, राष्ट्रवादी अधिक प्रभावी ठरली, याच राजकीय ताकदीतून राष्ट्रवादीने सेनेच्या सरपंच स्वामिनी डोलकर यांच्याविरुद्ध सोमवारी ७ मार्च रोजी अविश्वास ठराव दाखल करण्याचा प्रस्ताव निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार कविता जाधव यांच्याकडे दाखल केला. त्यानुसार शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्याची नोटीस बजावण्यात आली. त्याचवेळी युवानेते अजित पोकळे यांनी महत्त्वाची घडामोडी घडवून आणली. राजकीय उलथापालथ घडामोडीत अविश्वास ठराव फेटाळला गेला. महाराष्ट्र शासन यांच्याकडील ५ मार्च २०२० रोजीचे राजपत्र व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३५ (३) मधील (४) ची सुधारणेनुसार सरपंच, उपसरपंचाच्या निवडणुकीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीच्या आत आणि पंचायतीच्या मुद्दत समाप्त होणाऱ्या दिनांकापासून लगतपूर्वीच्या सहा महिन्यांच्या आत अविश्वासाचा प्रस्ताव आणता येणार नाही, याच तरतुदीनुसार अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याचे तहसीलदार कविता जाधव यांनी घोषित केले, याच प्रक्रियेत शिवसेनेचा पुन्हा एकदा विजय झाल्याचे अधोरेखीत झाले. सेनेकडे केवळ सरपंचासह एक सदस्य असताना सेनेने ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राखली. सेनेचे नेते किशोर जैन, तालुकाप्रमुख समीर शेडगे, किशोर पाटील, जयवंत पोकळे, प्रदीप पोकळे, सम्राट जोशी, अपर्णा पोकळे, मोनिका पोकळे, उज्वला नाईक, प्राजक्ता पोकळे, चंद्रकांत कारभारी,संदेश डोलकर मुख्यत: युवानेते अजित पोकळे व शिवसेनेने दमदार बाजी मारल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दरम्यान, दोन वर्षाच्या आत अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करता येत नाही, हे राष्ट्रवादीच्या नेतेगणांना माहीत असू नयेत, याबाबत आश्चर्य व्यक्त झाले, अविश्वास ठराव प्रस्ताव फेटाळल्याने राष्ट्रवादीची मोठी फसगत झाली, यातून राष्ट्रवादी पुढे कधीतरी बोध घेईल का? असे चोहोबाजूने बोलले जात आहे. तर युवानेते अजित पोकळे किंगमेकर ठरले, याच राजकीय घडामोडीतून स्थानिक पातळीवर सेना राष्ट्रवादी आघाडीत किती बिघाडी आहे, हे चित्र अधिक ठळक झाले आहे.