माणगांव तालुक्यात जमीन खरेदी-विक्री करत आहात तर सावधान!
बोगस व्यवहार करणाऱ्या टोळ्या तालुक्यात सक्रीय
तोतया इसम व खोटी सही करून जमीन विक्री; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बोगस व्यवहार प्रकरणी इंदापूर विभागातील 'मोठा मासा' लवकरच गळाला लागणार?
माणगांव : प्रमोद जाधव
माणगांव तालुक्यात तोतया इसम, खोट्या सह्या, बनावट कागदपत्रे बनवून जमीन विक्री करण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. काही दिवसांपासून याबाबत माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जमीन विक्री करत असताना मूळ शेतकऱ्याला माहीतच होत नाही की आपली जमीन विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांच्या कायदेविषयक अज्ञानपणाचा फायदा घेत गैरप्रकारे जमीन विक्री करणाऱ्या टोळ्यांचा हळूहळू पर्दाफाश होत चालला आहे. त्यामुळे माणगांवकरानो सावधान! तुमची जमीन विक्री झाले की नाही हे तपासून पहा. अशा बोगस व्यवहारांच्या बाबतीत माणगांव पोलीस ठाण्यात एका पाठोपाठ एक गुन्हे दाखल होत आहेत. मात्र असा प्रकार माणगांव तालुक्यातील इंदापूर विभागात देखील सुरू असल्याची तालुक्यामध्ये चर्चा सुरू आहे. आता इंदापूर विभागातुन जमीन गैरव्यवहाराचा गुन्हा कधी दाखल होणार याकडे संपूर्ण माणगांव तालुकवासीयांचे लक्ष लागले आहे.
निजामपूर विभागात घडलेल्या बोगस व्यवहार प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे वृत्त असे की, फिर्यादी राजेश जयराम पाकड यांचे वडील जयराम पाकड यांच्या नावे असलेली मौजे उधळेकोंड, ता. माणगांव येथील सर्व्हे नं. १६/९ क्षेत्र ०-३९-३० या क्षेत्राचे जमीन विक्री करण्याचे अखत्यारपत्र आरोपी प्रकाश पांडुरंग पाकड, रा. उधळेकोंड शिरसाड याने मिळविणे कामी फिर्यादी यांच्या वडिलांच्या जागी तोतया म्हणून आरोपी सुधीर गंगाराम लाड, रा. मळ्याचीवाडी यास उभे करून त्याचे फोटो लावून जयराम पाकड यांची खोटी सही करून अंगठ्याचे ठसे उमटविले. उभा केलेला तोतया इसम हाच खरा शेतकरी आहे अशी खोटी साक्ष आरोपी परशुराम पांडुरंग मानकर, मंगेश मनोहर चिले, रामदास गजानन सावंत यांनी शासकीय अधिकारी यांच्या समोर देऊन अखत्यारपत्रामधील कागदपत्र व अखत्यारपत्र लिहून देणारी व्यक्ती ही खोटी आहे हे माहीत व ज्ञात असताना देखील ते खरे म्हणून अखत्यार पत्र दुय्यम निबंधक कार्यालय माणगांव येथे सादर करून त्याची नोंदणीकृत दस्त नं. २६०५/२०२१ नोंद करून अखत्यारपत्राच्या आधारे जमीन आरोपी यांनी संगनमत करून पियुष विलास जैन रा. इंदापूर याना दि. २८ जानेवारी २०२१ रोजी खरेदीखत दस्त नं. २६६८/२०२१ किंमत रु. ४ लाखला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता विक्री केली.
याबाबत माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. ५८/२०२२ भा. दं. वि. सं. क. १९३, १९८, २००, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ सह नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ प्रमाणे ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे करीत आहेत.