भिसे गावासह पंचक्रोशीमध्ये राजकीय चप्पला बाहेर ठेऊन एकजूट रहावी - किशोर जैन
श्री भिसाई देवी कलशारोहण व प्राणप्रतिष्ठाच्या वेळी केली प्रार्थना
नागोठणे : महेंद्र माने
रोहा तालुक्यातील भिसे येथील श्री भिसाई देवीचे नवीन बांधण्यात आलेल्या मंदिराचे कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवार 19 व रविवार 20 मार्च रोजी करण्यात आला. त्यावेळी जि.प.सदस्य किशोर जैन यांनी भिसे गावासह पंचक्रोशीमध्ये राजकीय चप्पला बाहेर ठेऊन एकजूट रहावी; अशी प्रार्थना श्री भिसाई देवीकडे केली. यावेळी रोहा पं.स.सदस्य संजय भोसले,शिवसेना रोहा उपतालुकाप्रमुख विठोबा शिर्के,विभागप्रमुख संतोष खेरटकर,भिसे ग्रा.प.सदस्या नैना करंजे,शाखाप्रमुख हेमंत करंजे यांच्यासह राजीव टेमकर,विलास कालेकर,सचिन खांडेकर,सूरज करंजे तसेच भिसे व पंचक्रोशीतील नागरिक व भाविक उपस्थित होते.
किशोर जैन यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून साधारण 8.5 लाख रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या श्री भिसाई देवीच्या मंदिरामध्ये कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळात शनिवारी भिसाई देवीच्या मूर्तिची मिरवणूक, धान्यदिवास, जलधिवास, शय्यानिवास, भोजन, भजन व जागरण करण्यात आले. रविवारी गणेश व देवता पूजन,हवन,मूर्तीला जलाभिषेक तसेच लांजा येथील श्री 108 रहवशंकर शिवाचार्य राय पाटणकर महाराज यांच्या हस्ते मूर्तिची प्राणप्रतिष्ठा,कलशारोहण,पुनीहूर्ती व मंगल आरती करण्यात येऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी किशोर जैन यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना किशोर जैन यांनी सांगितले की, गेल्या वर्षी शिवजयंतीच्या वेळी मी मंदिर बांधण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची आज पूर्तता झाल्याचा मला आनंद होत आहे.माझ्या जि.प. च्या कारकिर्दीत या गावामध्ये शिवाजी महाराज स्मारक व देवीचे मंदिर होण्याचे भाग्य मला लाभले आहे. हे सर्व मी 80% समाजकारण व 20% राजकरणानुसार करीत असून यासाठी मला प्रसिद्धीची आवश्यकता नाही; तर देवीचा आशीर्वाद महत्वाचा असल्याचे सांगून मी देवीजवळ येथील भिसे गाव व पंचक्रोशीतील गावामध्ये राजकीय छप्पला बाहेर ठेऊन सर्वांची एकजूट रहावी, अशी प्रार्थना केल्याचे शेवटी किशोर जैन यांनी सांगितले. हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ व नवतरुण मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.