पाटणूस म्हसेवाडी परिसरात गाई गुरांवर संक्रांत!
गेल्या दोन दिवसात 12 गुरे दगावली, तर दोन गुरे गंभीर
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगाव तालुक्यातील पाटणूस म्हसेवाडी येथे गेल्या दोन दिवसात अचानक 12 गाई गुरे दगावली असून दोन गुरे गंभीर आजारी आहेत. दगावलेल्या गुरांमध्ये पोलीस पाटील प्रदीप म्हामुणकर, माजी उप सरपंच आंदेश दळवी, सुरेश दळवी, कोंडू ढेबे यांच्या गुरांचा समावेश आहे. गुरे दगावल्याची माहिती कळतच विळे येथून डॉ. कदम, माणगांव येथून सहाय्यक आयुक्त डॉ. डुबल व त्यांची टीम यांनी म्हसेवाडी येथे भेट देऊन दगावलेल्या गुरांची तपासणी केली. परंतु गुरे दगावून 24 तास उलटून गेल्या मुळे गुरांची शव चिकीत्सा करता न आल्याने गुरे कशाने दगावली आहेत यांचे निदान करणे अवघड असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अजून दोन गुरे आजारी असून या गुरांपैकी एखादे जनावर दगावले आणि गुरांच्या मालकांनी आम्हाला 4 तासाच्या आत कळविले तर दगावलेल्या गुरांची शव चिकित्सा करून गुरे दगावण्याचे निश्चित कारण समजेल असे डॉ. डुबल यांनी सांगितले. तसेच सध्या गर्मीचे दिवस असून गुरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो किंवा डबक्यातील साचलेले पानी प्यायल्यास सुध्दा गुरांचा मृत्यू होऊ शकतो अशी शक्यता डॉ. डुबल यांनी बोलून दाखवली. शिवाय डॉ. म्हणाले की, जनावरे कोणत्याही कारणाने दगावली तर त्यांना उघड्यावर टाकू नये त्यांना जमिनीत पुरावे कारण उघड्यावर गुरे टाकली तर इतर गुरे त्यांची हाडे चाटतात व त्यामुळे सुध्दा गुरांना त्याची बाधा होऊन गुरांचा मृत्यू होऊ शकतो. डॉक्टरांनी जरी या शक्यता बोलून दाखविल्या असल्या तरी गुरे मालकांचे समाधान झाले नाही. तलाठ्यांमार्फत पंचनामा करून ज्या मालकांचे नुकसान झाले आहे त्यांना प्रशासनाकडून योग्य ती मदत केली जाईल असे महाड माणगांव मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले व आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी सांगितले.
गुरे मालकांनी गुरांना सध्या जंगलात मोकळे सोडू नये व त्यांची काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.