माणगांव काळ नदीच्या पात्रात मगरीची दहशत, मच्छीमारांवर केला हल्ला 

माणगांव : उत्तम तांबे 

माणगांव येथील काळ नदीच्या पात्रात एका तरुणावर मगरीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेची चाहूल लागताच मदतनीस धावून आल्याने त्या अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचले. 

या घटनेची सविस्तर माहिती अशी की,  माणगांव काळ नदीकिनारी झोपडपट्टीत राहणारे सचिन बाबा पवार यांचे भाऊ नितीन बाबा पवार यांनी काळ नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी कंडाळ जाळे पसरले होते. सदर जाळे काढण्यासाठी ते नदीच्या पात्रात उतरले असताना अचानक मगरीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दरम्यान स्वतःला वाचविण्यासाठी नितीनने आक्रोश केल्याने त्यांचा भाऊ सचिन पवार व संजय काळे तसेच येथील झोपडपट्टीतील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन नितीन पवारचे प्राण वाचविले. या हल्ल्यामध्ये नितीन पवारच्या डाव्या पायाला मोठ्या प्रमाणात जखम झाली असून माणगांव उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत .

ज्या मगरीने हल्ला केला ती मगर सहा फूट लांब असावी असा तेथील लोकांनी अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या १४ वर्षांपूर्वी माणगांव काळ नदीच्या पात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात मृत अवस्थेत मगर सापडली होती. या नदीच्या पात्रात मगरींचे वास्तव्य असल्याने संपूर्ण माणगांव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही भयावह परिस्थिती दूर करण्यासाठी संबंधित वनविभाग अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन करून मगरींची शोध मोहीम सुरू करावी अशी मागणी माणगांवकर नागरिकांनी केली आहे. सदर परिस्थिती पाहता वेळ आणि काळ सांगून येत नाही म्हणून नदीकिनारी असलेल्या झोपडपट्टीतील लोकांनी तसेच माणगांवकर नागरिकांनी या घटनेची दखल घेत सावध राहावे असे आवाहन माणगांव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी केले आहे.

Popular posts from this blog