पाटणूस जि. प. शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचा राजा शिवछत्रपती यांची जयंती रायगड जि. प. शाळा पाटणूस येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश चाळके यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख घालून शिवप्रतिमेस अभिवादन केले. शालेय विद्यार्थ्यांनी शिवचरित्र सांगणारे मनोगत व्यक्त केली.
शक्ती आणि युक्ती यांचा समतोल साधून गनिमी काव्याने शिवरायांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण केले. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या शाळेचे व गावाचे नाव रोशन करावे असे श्री. चाळके यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खटके सर यांनी केले. या जयंती उत्सवानिमित्त शैलेश चाळके, शैलेश म्हामुणकर, इरेवाड सर, बंडगर सर, राठोड सर, रोंगटे सर इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी खाऊवाटप करून श्री .राठोड सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.