युक्रेनमध्ये अडकला नागोठण्याचा नहुश गायकवाड; कुटुंबिय चिंतेत
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील नहूश गौतम गायकवाड हा युक्रेन येथील तर्णोपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर सिटीमध्ये एम.बी.बी.एस.च्या तिसर्या वर्षात शिकत आहे. सद्यस्थितीत युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्ध परिस्थितीत भारतातील साधारण 47 विद्यार्थ्यांसह नहुश हा विद्यार्थी अडकला असल्याची माहिती नहुशचे मामा नितिन सिंगणकर यांनी दिली. नहूशचे आई वडील चिंतेत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना नितिन सिंगणकर यांनी सांगितले की, नहूशचा संपर्क शुक्रवार 25 फेब्रुवारी रोजी रात्री झाला असून त्यावेळी त्यांनी सांगितले की, भारत सरकारने सर्व विद्यार्थ्यांना काही सूचना दिल्या व तेथून जवळच्या राष्ट्रांमध्ये जाण्यास सांगुन तिकडे जाताना हातात कींवा वाहनावर भारताचा ध्वज ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी व माझ्या सोबत असलेले साधारण 47 विद्यार्थी सरकारने दिलेल्या सूचनेनुसार निघालो असून आमच्या ठिकाणांवरून जवळ असलेल्या सर्वच राष्ट्रांच्या सीमा खूप दूर आहेत. परंतु येथील रस्त्यांवर अनेक वाहने आहेत.त्यामुळे जर का वाहनांची रस्त्यावर झालेल्या कोंडीमुळे बस अडकली तर आम्ही सर्व चालत जवळच्या राष्ट्रांमध्ये जाणार आहोत. तसेच नहूशचे आई वडील व लहान भाऊ राजस्थान येथे नोकरी निमित्त रहात असून ते अतिशय चिंतेत आहेत. तरी आपल्या सरकारने या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरूप आणावे; अशी विनंती नितिन सिंगणकर यांनी केली आहे.