कोविड संपला असे गृहीत धरू नका शासनाचे नियम पाळा - तळा तहसीलदार श्री. कनशेट्टी
तळा : संजय रिकामे
कोविड - १९ विषाणूचा ओमिक्रॉन हा नवीन प्रकार जगभरात वेगाने फैलावत असून कोविड संपला असे गृहीत धरू नका! शासनाचे नियम पाळा असे आवाहन तळा तहसीलदार श्री. कनशेट्टी यांनी तळा व्यापारी असोसिशन बैठकीत केले. यावेळी तळा पोलिस निरीक्षक श्री. ओमासे, व्यापारी असोसिशनचे अध्यक्ष श्रीराम कजबजे, उपाध्यक्ष श्री. पटेल, माजी नगरसेवक चंद्रकांत रोडे, तळा प्रेस क्लब अध्यक्ष संजय रिकामे, पत्रकार किशोर पितळे, श्रीकांत नांदगावकर, भाजी विक्रेते, मिनिडोर संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, तिसरी लाट आल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ शकतो. कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून शासन आणि प्रशासन वारंवार आवाहन करित असतानाही त्याचे बहुतांश ठिकाणी योग्यरित्या पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांमध्ये नियम मोडले जात असल्याचे आढळते आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे योग्य पालन करावे, कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी, मास्क लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.
नियम मोडणाऱयांवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायत आणि पोलिस प्रशासन स्तरावर पथक कार्यरत राहील. लग्न व इतर समारंभांमध्ये उपस्थितीची मर्यादा काटेकोरपणे पाळावी .हॉटेल्स, उपहारगृह आदी ठिकाणी नियमांचे योग्य पालन करावे. नववर्ष स्वागताचे समारंभ आयोजन टाळावे. मास्कचा वापर करावा, कोविड लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.दरम्यान, नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर नगरपंचायत स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. नाताळ (ख्रिसमस), नवीन वर्ष स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन करणे टाळावे, समारंभांमध्ये गर्दी करु नये, कोविड प्रतिबंधात्मक वर्तन राखावे, असे आवाहन पुनश्चः एकदा तहसीलदार कनशेट्टी यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.