देवकान्हे गावात सांडपाण्यामागे राजकारण? दुषित पाण्यामुळे कुटूंबाला त्रास होत असल्याची तक्रार 

रोहा : समीर बामुगडे

रोहा तालुक्यातील देवकान्हे गावात सांडपाणी सोडून एका कुटूंबाला त्रास देण्यामागे देखील राजकारण असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्यामुळे येथील ग्रामपंचायतीच्या व स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघू लागले आहेत. 

देवकान्हे येथील राकेश गणेश येलकर यांनी रायगड जिल्हाधिकारी, जि. प. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व संबंधित विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनीच रस्त्यावर सांडपाणी सोडून त्रास देण्यास सुरूवात केली आहे. या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याप्रकरणी तक्रारदार राकेश येलकर यांनी यासंदर्भात ग्रामसेविका यांच्याशी संपर्क साधला असता "यामध्ये राजकारण आहे त्यामुळे तुम्ही मला एकटीलाच याबाबत का विचारता?" असे बोलून दुर्लक्ष केले. त्यानंतर राकेश येलकर यांनी यासंदर्भात "आपले सरकार" या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर सदरची तक्रार रा.जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी हस्तांतरित करण्यात आली. परंतु त्यावर अद्यापही कोणत्याही प्रकारे कार्यवाही करण्यात आलेली नाही. 

देवकान्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत अशा प्रकारे सांडपाणी सोडून त्रास देण्याचे घाणेरडे राजकारण केले जात असल्याने हा चर्चेचा विषय बनून राहिला आहे.

Popular posts from this blog