रोहा शहरातील अवैध चक्री जुगारावर राजकीय वरदहस्त! पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता?
धाटाव/रोहा : किरण मोरे
रोहा शहरात सध्या अवैध ऑनलाईन चक्री जुगार जोरदार सुरू असून येथे राजकीय क्षेत्रातील लोकांची वर्दळ पाहता या जुगारावर राजकीय वरदहस्त असल्याचे दिसत आहे. या बेकायदा चक्री जुगारावर कारवाई होत नसल्याने पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. त्यामुळे येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.
रोहा शहरातील धावीर मार्केट, रायकर पार्क, खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला आणि नवरत्न हॉटेलच्या परिसरात असे एकूण ४ ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली आहे. परिणामी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी तातडीने दखल घेऊन हा अवैध चक्री जुगार बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.