शिहू विभाग परिसरात अवकाळी पावसाची पून्हा हजेरी, शेतकरी आर्थिक संकटात
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
रायगड जिल्हातील शेतकऱ्यांचे संकट काही संपता संपत नाही, मी पून्हा येईन, मी पून्हा येईन असं करत अवकाळी पावसाच्या सरी कधीही बरसत आहेत. वारंवार वातावरणात होत असलेल्या बदलाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जो काही शिल्लक राहिला होता तो ही आता जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्याने जगायचं कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या आधी झालेल्या पावसात भाताच्या मळणीसह वाल पीक, भाजीचे मळे, आंब्यांवरील मोहर नष्ट झाले होते शेतकऱ्याने दुबार वाल पीक व भाजीची लागवड केली, मात्र वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे ते ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या मुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर मळभयुक्त ढगाळ वातावरण होते दुपारनंतर अचानक मुसळधार पावसाळा सुरवात झाली आणि साऱ्यांची धावपळ उडाली. पावसाचा हा लहरीपणा कधी थांबेल, आदीच शेतकरी कर्ज काढून बी, बियाणे, खते, अवजारे खरेदी करतो आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत आयुष्य काढतो या मुळे शेतकऱ्यांवर भीक मागायची वेळ आली आहे. प्रशासनाने आता तरी दाखल घेत शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे.