मारहाण प्रकरणी आरोपीला ३ महिने सश्रम कारावास व ३ हजारांचा दंड
रायगड : किशोर केणी
शुल्लक कारणावरुन फिर्यादीस मारहाण केल्याप्रकरणी आरोपी विजय भोलानाथ केंदकी. रा. नवगाव याला अलिबाग येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. ए.व्ही.मोहिते यांनी भा.दं.वि.कलम ३२४ व ४५२ प्रमाणे दोषी धरुन ३ महिने सश्रम कारावास व ३ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
फिर्यादी अनंत नारायण वाटकरे यांना आरोपी यांनी घरात घूसून फिर्यादी जिन्यावर चढत असताना त्यांचा पाय ओढून त्याना खाली पाडून, लाकडी दांडक्याने मारहाण करुन तुळशीच्या कट्ट्यावर ढकलून देऊन जखमी केले म्हणून अनंत वाटकरे यांनी अलिबाग पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती.
तपासी अंमलदार व्ही.डी. सायगावकर यांनी तपास पुर्ण करुन अलिबग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात अभियोगपक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी व वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. या खटल्यात अभियोगपक्षातर्फे सरकारी वकिल श्रीमती कविता परीट यांनी काम पाहीले. सदर खटल्यात पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार जी.एस.पवार व पी.एन.ठाकूर यांचे सहकार्य मिळाले.