आत्ताचे हे वय शिकण्याचे आहे, तेच चांगलेपणाने शिका, तुमची ओळख तुम्हीच निर्माण करा! 

पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी

नागोठणे येथील भाएसोच्या शेठ ओटरमल शेषमल परमार कॉलेजमध्ये ५९ व्या पोलिस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. यावेळी नागोठणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, सावंत, देसाई, विनोद पाटील तसेच कॉलेजचे प्राचार्य प्रविण भारती, विद्यार्थी-विद्यार्थीनी व कॉलेज शिक्षकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये ते असे म्हणाले की, ही संस्था मुलांचे भवितव्य घडविण्याचे चांगले काम करीत आहे. ते आपल्या भाषणात असेही म्हणाले की, मास्क वापरा, हात वारंवार धुवा म्हणजे आपण आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घेऊ. घराबाहेर पडताना सोशल डिस्टन्स पाळा. व्हॅक्सिन घ्या. नुसते व्हॅक्सिन घेतलं तर कोरोना होणार नाही असं मुळीच समजू नका. त्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळा. पोलीस आणि जनता याच्यांत सुसंवाद होणे गरजेचे आहे. पोलीस हे जनतेच्या सुरक्षिततेसाठीच आहेत. विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप, फेसबुक पासून लांब रहावे. अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट घेऊ नका. आत्ताचे हे वय शिकण्याचे आहे तेच चांगलेपणे शिका. तुमची चांगली ओळख तुम्हीच निर्माण करा. 

छोट्या-मोठ्या आमिषांना बळी पडू नका. खरे पुरुषत्व हे मुलींची छेड काढण्यात नसून समाजात वावरत असताना आपण नैतिकतेचे भान ठेवून वागले पाहिजे. तसेच, महिला व अन्य कोणावरही अन्याय होत असल्यास त्यास विरोध केला पाहिजे यातच खरे पुरुषत्व आहे! आपल्यावर झालेले संस्कार हे आपणच दाखवत असतो. सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून बँकेच्या कस्टमर केअरच्या नावाने कुणाचाही कॉल आला तर आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) कोणालाही सांगू नका, कारण त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. स्रियांना त्यांचे हक्क माहीत असलेच पाहिजेत. गुड टच बॅड टच मुलींना कळले पाहीजेत. मुलींनी छेड काढण्याची काही तक्रार दाखल केल्यास पोलीस स्टेशनमध्ये अशा तक्रारींचे निवारण महिला समितीमार्फत केले जाते. अल्पवयीन मुला-मुलींसाठी पोस्को कायदा २०१२ अंर्तगत करण्यात आलेल्या विविध उपाय योजना वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी होणारी शिक्षा यांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

मुलींची कोणी छेड काढल्यास अथवा त्या संकटात असल्यास त्यांनी ११२ हा नंबर जर डायल केल्यास संबंधित मुलीचे लोकेशन ट्रेस होते व बीटमार्शल टिम १० मिनीटात घटनास्थळी दाखल होते. मुलांनी गाडीवर ट्रिपलसीट फिरू नये. भयमुक्त व विश्वासार्हता असे जीवन प्रत्येकाने जगले पाहीजे. तसेच नवीन पारित करण्यात आलेल्या शक्ती कायद्याविषयी सांगताना पंधरा दिवसांत पोलीस तपास पूर्ण करुन कोर्टात चार्जशीट दाखल करावी लागते अशी ही माहिती दिली. यू ट्यूबला सगळ्या कायद्यांची माहिती आहे. कुठलाच गुन्हा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांकडून कळत-नकळत गुन्हा घडल्यास त्याचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांना आयुष्यभर भोगावे लागू शकतात व त्यामुळे सरकारी नोकरी अथवा पोलीस व्हेरिफिकेशन करतेवेळी अडचणी येतात. प्रत्येकाने शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहीजे.

या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष किशोर जैन व संस्थेचे सीईओ कार्तिक जैन यांनी व कॉलेजचे प्राचार्य प्रविण भारती यांनी पोलीसांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog