कोरोना पासून स्वतःला सुरक्षित ठेवणाऱ्या ज्येष्ठ ग्रामस्थांचा माहेरवाशिणींच्या संघटनेतर्फे सत्कार

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगांव तालुक्यातील पाटणूस येथे कुंडलिका विद्यालयाच्या सभागृहात "माहेरचा कट्टा" या माहेर वाशिणी संघटनेच्या महिलांनी सलग तीन वर्षे कोरोना महामारीपासून सुरक्षित राहून कोरोनाला आपल्या पासून दूर ठेऊन स्वतःचे आरोग्य जपणाऱ्या पाटणूस गावामधील ज्येष्ठ ग्रामस्थांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला बहुतांश ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करून गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे, आकस्मिक निधनाने तसेच वृद्धापकाळाने ज्या ग्रामस्थांचे निधन झाले होते अशा ग्रामस्थांना सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली व त्या नंतर सर्वांना शाल श्रीफळ, मास्क व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

एक माहेर वाशिणी अंगणवाडी वाडी सेविका विमल शिवराम म्हामुणकर  जिने बालवाडी व अंगणवाडी सेविका म्हणून पाटणूस गावात 45 वर्षे सेवा दिली व निवृत्त झाली या अंगणवाडी वाडी सेविकेचा माहेर वाशिणींनी जेव्हा सत्कार केला तेव्हा या अंगणवाडी सेविकेला गहिवरून आले होते. ज्येष्ठ ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे व माजी सरपंच तसेच माहेरवाशिणी शिवानी संजय म्हामुणकर यांनी यावेळी आपले बहुमूल्य विचार मांडले. 

अनेक जेष्ठ ग्रामस्थांनी माहेर वाशिणींच्या या उपक्रमाबद्दल गौरवोदगार काढले व माहेर वाशिणींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जे ज्येष्ठ ग्रामस्थ वृद्धापकाळामुळे कार्यक्रमासाठी येऊ शकले नाहीत अशा ग्रामस्थांचा माहेर वाशिणींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.

Popular posts from this blog