रायगड जिल्ह्यात महामार्ग पोलीसांना लागलीय भीक?
पांढऱ्या वर्दीचा वापर करून करतात काळी कमाई
"चिरीमिरी"साठी वाहनचालकांची खुलेआम लुटमार
हे पोलीस आहेत, की लुटारू? वाहनचालकांमध्ये संभ्रम!
रायगड : किशोर केणी
मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड ते नागोठणेच्या दरम्यात ऐनघर येथे महामार्ग पोलीसांची एक चौकी आहे. पण ही चौकी म्हणजे वाहनचालकांच्या लूटमारीचे केंद्र असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. कारण येथील पोलीसांनी पांढऱ्या वर्दीचा वापर करून काळी कमाई सुरू ठेवली आहे. त्यामुळे हे पोलीस आहेत, की लुटारू? याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
येथील महामार्ग पोलीसांना डिपार्टमेंटकडून मिळणाऱ्या पगारामध्ये स्वतःच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी "चिरीमिरी" पैसे कमविण्यासाठी वाहनचालकांची लुबाडणूक सुरू केलेली आहे.
महामार्गावरील बिजली हॉटेलच्या परिसरात सात ते आठ पांढऱ्या पोशाखातील लुटारूंची टोळी सज्ज!
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते कोलाडच्या दरम्यात असलेल्या बिजली हॉटेलच्या परिसरात ह्या लुटारू पोलीसांची टोळी सज्ज असल्यामुळे महामार्गावर वाहनचालकांना दमदाटी करणे, कारवाईची भीती दाखवून पैसे लुबाडणे असे प्रकार येथे नेहमीच असल्याने वाहनचालकांना सुरक्षेऐवजी लुबाडणुकीचीच जास्त भीती वाटू लागली आहे.
रायगड जिल्ह्यातील महामार्ग पोलीसांना वाहतुकीचे नियम माहिती आहेत का?
कोलाड ते नागोठणेच्या दरन्यात ऐनघर परिसरात असलेल्या महामार्ग चौकीतील पोलीस हे मंदबुद्धी आहेत का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण येथील पोलीसांनाच वाहतुकीचे नियम माहिती नसल्याची उदाहरणे समोर येत आहेत. येथील पोलीस हे 'नंबरप्लेट नसलेल्या' बाईकवरून प्रवास करताना स्पष्टपणे दिसून आलेले आहेत. त्यामुळे इतरांना वाहतुकीचे नियम व कायदे शिकविणारे पोलीसच नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे उघडकीस आल्याने येथील पोलीसांच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघू लागले आहेत.
वाहनचालकांची सुरक्षा की लूटमार?
महामार्ग पोलीसांची कर्तव्ये काय आहेत? याबाबत येथील पोलीसांना विसर पडल्याचे दिसून येत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील या लुटारू पोलीसांवर नियंत्रण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गावर चुकीच्या नियोजनामुळे भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. परिणामी महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक व वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष देऊन येथील लूटमार करणाऱ्या पांढऱ्या वर्दीतील सात-आठ पोलीसांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.