रोहा नगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्या अनियमित कामकाजामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला?
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला धोका!
शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार दाखल
धाटाव/रोहा : किरण मोरे
रोहा नगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्या अनियमित कामकाजामुळे शिक्षण विभागात खेळखंडोबा सुरू असल्याचे दिसत असून येथील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला धोका निर्माण झालेला आहे. याप्रकरणी शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र राज्य - मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल झालेली आहे.
रोहा नगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्याकडे रोहा नगर पालिका व्यतिरिक्त महाड नगरपालिकेचा अतिरिक्त चार्ज आहे. मात्र याचा गैरफायदा घेऊन ते सतत गैरहजर असतात. रोहा नगर पालिका शाळांमध्ये पटनिश्चितीनूसार शाळा शिक्षकांचे नियोजन केले जात नाही. रोहा नगर पालिका शाळांमध्ये पटनिश्चितीनुसार मुख्याध्यापक समायोजन केले जात नाही. येथील शाळांतील अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांच्या खरेपणाविषयी चौकशी होणे आवश्यक आहे. प्रशासन अधिकारी यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता आढळून येते. मुख्याध्यापक आणि पालकांची शाळा समिती यांनी घेतलेले निर्णय आणि केलेला खर्च याचा कधीह आढावा घेण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कधीही जबाबदारीने तपासणी केलेली नाही. एकाच जागेवर तीन वेगवेगळ्या नावाने कमी पटांच्या शाळा भरवणे कायदेशीररित्या चुकीचे असताना रोहा नगर पालिकेच्या मंगलवाडी संकुलात तीन वेगवेगळ्या नावाने प्राथमिक शाळा भरवल्या जातात. शिक्षक अतिरिक्त होऊ नये म्हणून प्रशासन अधिकारी, रोहा नगर पालिका शासनाची फसवणूक करीत आहेत.
या सर्व कारणांमुळे रोहा नगर पालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा खालावला आहे. समतोल बिघडत चालला आहे. रोह्यातील एक संपूर्ण पिढी उध्वस्त होत आहे. तरी प्रशासन अधिकारी रोहा यांची तातडीने चौकशी लावावी व कारवाई करावी अशा प्रकारची तक्रार रोहा तालुक्यातील तक्रारदारांनी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.