रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ, पोलीसांचे दुर्लक्ष! अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर
थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल
रोहा : किरण मोरे
रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा मायाजाळ पसरलेला असून असून अनेक जुगारवेडे तरूण यामध्ये गुरफटत चालले आहेत. येथील बेकायदा चक्री जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. या चक्री जुगाराच्या माध्यमातून अनेक तरूणांना लुबाडले जात असून त्यांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. यांसदर्भात संबंधित तक्रारदारांनी थेट महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता पोलीस यासंदर्भात काय कारवाई करतीस, ते पाहणे महत्वाचे आहे!
रोहा शहरातील धावीर मार्केट, रायकर पार्क, खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला आणि नवरत्न हॉटेलच्या परिसरात असे एकूण ४ ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून या ऑनलाईन जुगाराच्या नादाने अनेक जुगारवेड्या तरूणांनी घरातील महिलांचे दागिने विकल्याचे धक्कादायक प्रकार देखील यापूर्वी घडलेले असून काही ठिकाणी घातपाताच्या घटना देखील घडलेल्या आहेत.
त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तातडीने सदरच्या ऑनलाईन चक्री जुगारावर कारवाईचे आदेश देऊन हा अवैध चक्री जुगार बंद करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.