महामार्ग पोलीसांकडून होणारी लूटमार थांबेल कधी?
वाहनचालकांची लूटमार पोलीस दलासाठी लज्जास्पद!
नागोठणे ते कोलाड दरम्यान मगामार्ग पोलीसांचे भयाण सत्य
रायगड : किशोर केणी
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे ते कोलाडच्या दरम्यान लुटारूंच्या टोळक्याने धुमाकूळ घातलेला असून हे लूटारू म्हणजे दुसरे तिसरे कुणीही नसून वाहनचालकांना लुबाडणारे प्रत्यक्षात पांढऱ्या वर्दीतील महामार्ग पोलीसच आहेत! त्यामुळे येथे वाहनचालकांची होणारी ही लूटमार म्हणजे पोलीस दलासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे.
महामार्ग पोलीसांचे कार्य काय असते? ड्युटी कशा प्रकारे करावी? महामार्गावरील वाहतूकीचे नियोजन कसे करावे? योग्य प्रकारे कारवाई कशी करावी? याबाबतचे काडीमात्रही ज्ञान येथील महामार्ग पोलीसांना नसल्याचे दिसत आहे. कारण नागोठणे ते कोलाडच्या दरम्यात महामार्ग पोलीसांचे 'हेल्मेट' संदर्भातील कारवाईबाबत विचीत्र चाळे सुरू आहेत. या मार्गावरून १० बाईकस्वार विनाहेल्मेट जात असतील तर त्यांतील फक्त एकावरच पावती फाडण्याची कारवाई करायची आणि बाकीच्या ९ जणांना घाबरवून त्यांच्याकडून २०० ते ५०० रूपये घेऊन सोडून द्यायचे. स्वतःचा खिसा भरण्यासाठी अशा प्रकारे खुलेआम लूटमार सुरू ठेऊन येथील महामार्ग पोलीसांनी पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली आहे. वाहनचालकांना विनाकारण अडविणे, चुकी नसतानाही त्यांना विनाकारण दमदाटी करणे, पैशाची मागणी करणे, पैसे न दिल्यास लायसन्स जप्त करण्याची धमकी देणे यांसारखे विचीत्र उद्योग येथील महामार्ग पोलीसांनी सुरू ठेवल्याने या पोलीसांपेक्षा दरोडेखोर परवडले! अशी संतप्त प्रतिक्रीया अनेक वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.