रोहा नगर पालिकेच्या मंगलवाडी प्राथमिक शाळेचे पूर्वीचे स्वरुप काळानुसार बदलतेय

निष्क्रीय प्रशासन अधिकाऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याला धोका!

धाटाव/रोहा : किरण मोरे

रोहा नगर पालिका मंगलवाडी शाळा डिजिटल झालेली आहे. या शाळेद्वारे डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी रोहा नगर पालिकेने प्रोजेक्टरची व्यवस्था केलेली आहे. नगर पालिकेच्या निधितून सुंदर इमारती, मैदाने साकारली आहेत. त्यात आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शौचालय, पाणी, पोषण आहार, प्रयोगशाळा, स्कॉलरशिप अशा शासकीय सेवा चालू केल्या आहेत. आजच्या स्थितीत खाजगी शाळासारखीच या शाळेचीही ताकत वाढलेली आहे.  

एकेकाळी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधत नियम, संस्कार, शिस्त, मूल्ये मंगलवाडी शाळेतच मिळणार असा या शाळेचा नावलौकिक होता. चांगला पाल्य आदर्श नागरिक घडवत या शाळेतील कित्येक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील झाले व आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तीवंत झालेत. या शाळेतील गुणवत्ता व महत्त्व थोडेही कमी झालेले नाही. या शाळेला फक्त आवश्यकता आहे चांगल्या प्रशासन अधिकाऱ्याची. तरच ही शाळा जीवंत राहील असे चर्चिले जात आहे. इतिहासात प्रथमच एवढा स्वार्थी आणि निष्क्रिय प्रशासन अधिकारी येथे कार्यरत असल्याचे दिसून आलेले आहे.

येथून वारंवार शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे पाल्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. पाल्यांचे भवितव्य धोक्यात आहे. काही स्वार्थी लोकांनी शाळेलाच संपविण्याचा डाव आखला आहे. त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. शिक्षकांमध्ये डावा उजवा करुन दुही पसरवत आहेत. बदली केलेल्या गुणवंत शिक्षकांसोबत विद्यार्थी देखील आता शाळा सोडून जात आहेत. मुख्याध्यापक शाळेत कमी आणि चावडीवर जास्त असतात. तिथे अक्कल वाटायचे त्यांना महिन्याला लाखो रुपये मिळतात. शाळेचा पट टिकवायची जबाबदारी या मुख्याध्यापकांचीच आहे. पण मुख्याध्यापकांवर प्रशासन अधिकाऱ्याचा अंकुश नाही. ऑफिस मध्ये सतत गैरहजर असणारा बेजबाबदार प्रशासन अधिकारी लाभल्याने सगळीकडे अंदागोंदी माजली आहे. 

शाळेतील पाल्याचा दर्जा खालावत चालला आहे. इथून बाहेर पडणारा विद्यार्थी चार लोकांसमोर साधं पुस्तकही वाचू शकत नाही. एकदा वरिष्ठांकडून खरंच या शाळेची पाहणी होणं गरजेचं आहे. मुख्याध्यापकांच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना मराठीचे धडे वाचायला सांगितले पाहिजेत तेव्हाच या प्रशासन अधिकाऱ्याचा आणि मुख्याध्यापकाचा नाकर्तेपणा सर्वांच्या लक्षात येईल. 

गोरगरिबांच्या पाल्यांसाठी अशा प्रकारच्या शाळा जगल्या पाहिजेत पण तशी दृष्टी असणारा प्रशासक नेमला गेला पाहिजे.

Popular posts from this blog