शिवसेनेची स्वबळ एक्स्प्रेस सुसाट; एका जागेवर बिनविरोध विजय होण्याची शक्यता
तळा नगरपंचायत सर्वच पक्ष आमने सामने
तळा : संजय रिकामे
तळा नगरपंचायतीत उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांसमोर दंड थोपटले आहेत. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शेकाप, मनसे, वंचित बहुजन आघाडी यांनी आपले उमेदवार या निवडणूकीसाठी उभे केले आहेत. यामध्ये शिवसेनेची स्वबळ एक्सप्रेस सुसाट असुन सतरा जागांपैकी पंधरा जागी शिवसेनेचे उमेदवार उभे असून दोन ठिकाणी शिवसेना पुरस्कृत उमेदवार उभे करण्यात आले आहेत. यामध्ये जोगवाडी येथून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार श्री. मंगेश गणपत पोलेकर यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज आलेला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे पक्के झाले आहे.त्यामुळे शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ने गाजावाजा करत आपले उमेदवारी अर्ज भरले असले तरी १७ जागांपैकी त्यांनी केवळ १३ जागांवर उमेदवारी अर्ज भरले आहेत. या १३ जागांपैकी ना.मा. प्र. आरक्षण पडलेल्या ४ प्रभागात निवडणूक होणार नसल्याने याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे कारण या चार प्रभागातील तीन विद्यमान नगरसेवक हे राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आहेत. प्रभाग क्रमांक १५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत भोरावकर यांना ग्रामस्थांनी बिनविरोध देण्याची चर्चा सुरू होती परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणले आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेकडून हरकत घेतल्या नंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ती हरकत फेटाळली या निर्णया विरुद्ध शिवसेनेकडून माणगाव उपजिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले आहे शिवसेनेने दावा केला आहे की प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवाराचा अर्ज बाद होणार आज संध्याकाळ पर्यंत निकाल अपेक्षित आहे परंतु जर या प्रभागातील उमेदवार बाद झाला तर याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत बसू शकतो.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी तळा शहरात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे पारंपारिक राजकीय शत्रू आहेत. आतापर्यंत दोन्ही पक्ष नेहमीच आमने-सामने राहिले आहेत. गत निवडणुकीतही शिवसेना राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत झाली होती. त्यामध्ये शिवसेना ११ राष्ट्रवादी ५, आणि अपक्ष (राष्ट्रवादी पुरस्कृत )१ असे नगरसेवक निवडून आले होते.
ज्येष्ठ नेते रविभाऊ मुंढे यांच्या भाजपा प्रवेशाने भाजपाची ताकत वाढली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवणार आहे. शिवसेना नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, शेकाप, वंचित बहुजन आघाडी मनसे यांनी देखील उमेदवार उभे केले असल्याने नगरपंचायतीवर सत्ता सहज मिळावी यासाठी अंतर्गत आघाडी व युतीसाठी बोलणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. याचा फटका कोणाला बसणार यावर नगरपंचायतीचा निकाल अवलंबून राहील तूर्तास शिवसेनेची स्वबळ एक्स्प्रेस सुसाट असून एका जागेवर बिनविरोध विजय होण्याची शक्यता आहे.