पाटणूसच्या माहेरवाशिणींचा हृदयस्पर्शी सोहळा संपन्न
१८ ते ७० वर्षे वयोगटातील माहेरवाशिणींचा सहभाग
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील पाटणूस मधील महिलांनी "माहेरचा कट्टा" व्हाट्सअप ग्रुप तयार केला असून या ग्रुपमध्ये १५० महिलांचा सहभाग आहे. या ग्रुपमुळे अनेक माहेरवाशिणी एकमेकींच्या संपर्कात आल्या. त्यांच्या संपर्कात येण्यानेच गेट टुगेदर ची संकल्पना पुढे आली. सर्वप्रथम १४ नोव्हेंबर ही गेट टुगेदर तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली परंतु जी नवीन तारीख निश्चित केली तिलाही अडचण आली त्यात एसटी बसचा संप! त्यामुळे तर आणखी मोठी समस्या निर्माण झाली होती. शेवटी कीतीही अडचणी आल्या तरी कार्यक्रम करायचाच असे ठरले व त्या प्रमाणे 12 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. या तारखेला ही अडचण होतीच परंतु यावेळी मात्र महिलांनी तीच तारीख कायम ठेवली 150 पैकी जेमतेम 30 महिला येतील असा अंदाज होता परंतु प्रत्यक्षात 70 महिला उपस्थित राहिल्या.
खूप वर्षांनी इतक्या माहेर वाशिणी एकत्र आल्याने एकच जल्लोष झाला. आयोजक महिलांनी अतिशय शिस्त पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती. कुंडलिका विद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम होणार असल्याने सर्व माहेर वषींनी प्रथम सोमजाई मंदिरात गेल्या त्याठिकाणी त्यांनी गुलाबी व भगव्या रंगाचे फेटे परिधान केले व सर्व जणींनी मिळून देवीची ओटी भरली. तिथून आल्यावर स्थानिक माहेरवाशिणींनी सभागृहात प्रवेश करणाऱ्या महिलांचे औक्षण करून प्रथम जेष्ठ माहेरवाशिणी नंतर इतर या प्रमाणे सर्वांना सभागृहात प्रवेश देण्यात आला जेष्ठ माहेर वाशिणी सौ. सुंनदा सावंत यांना अध्यक्ष स्थान देण्यात आले. सूत्र संचलनाची जबाबदारी संगीता ताई पिसाळ तसेच ज्योती दरेकर यांनी उत्तम रित्या संभाळली. संगीता ताईंनी प्रत्येक माहेर वाशिणींची ओळख सांगितली. पाटणूस च्या स्थानिक माहेर वाशिणी व ग्रामपंचायत पाटणूसच्या माजी सरपंच शिवानी म्हामुणकर यांनी आपल्या खणखणीत भाषणाने अनेकांना मंत्रमुघ केले तर काही प्रसंगी महिलांना अश्रू अनावर झाले. अनेकींनी आपल्या लहान पणीच्या आठवणी सांगितल्या. या नंतर केक कापून पहिला गेट टुगेदर सर्वांनी साजरा करून एक मेकींना केक भरविला केक मधून सुरवातीला सर्व माहेर वाशिणीचे फोटो बाहेर आले तो प्रसंग पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती. डेकवर गाणी लावून मग सर्वांनी न लाजता व वयाचे भान न ठेवता डान्स केला, संगीत खुर्ची, गाढवाला शेपूट लावणे, या सारखे गेम खेळून सर्वांनी अक्षरश:धमाल केली त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा आपण लहान झाल्याचा आनंद लुटला. शेवटचा हळदी कुंकू च्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली एका हृदय स्पर्शी कार्य क्रमानंतर अनेकींनी एकमेकींची गळाभेट घेऊन पुढच्या वर्षी या कर्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा नक्की भेटू असे आश्वासन देऊन साश्रू नायनाने एक मेकींचा निरोप घेतला.
माहेरवाशिण : संगीता पिसाळ यांची प्रतिक्रीया...
आपल्या माणसांचे आभार आपणच नसतात मानायचे. जिव्हाळ्याचे भाव त्यांचे फक्त असतात जपायचे. अशाच या सोहळ्यामधून जपायची असतात नाती. हृदयात असतात साठवायचे आनंदाचे मोती. असे असले तरी आभार मानायचा मोह आवरत नाही. म्हणूनच काही दोन शब्द
एका बागेत रंगीं बेरंगी फुलपाखरे आनंदाने बागडत असतात तशाच सर्वजणी कार्यक्रमात खूपच आनंदात होत्या. सर्वांना भेटून खूप समाधान वाटले. यासर्वांचे श्रेय खरे तर आरती म्हामुणकर, आरती दळवी, कमलताई, सविता ताई या सर्वांचे आहे. या सर्वांना माझा सलाम. पुन्हा एकदा लहानपण अनुभवायला दिल्या बद्दल माझ्या सर्व बहिणी, आत्या आणि सख्या यांचेही खूप खूप आभार. एक हृदय स्पर्शी गौरव सोहळा घडवून आणण्यात आरती म्हामुणकर, आरती दळवी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे मनापासून आभार. आपली अशीच प्रगती होत राहो ही सोमजाई चरणी प्रार्थना.